
ईव्हीएम घोटाळ्यात रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यापाठोपाठ त्यांची कन्या प्राजक्ता महालेचे नाव पुढे आले आहे. प्राजक्ता हिनेच मंगेश पंडलेकरला मोबाईल दिला. तिने हातातील पॅडखाली मोबाईल लपवून छुप्या पद्धतीने फोनाफोनी केली. मतमोजणी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकला, असा गंभीर आरोप तक्रारदार भरत शाह यांनी केला आहे. त्यामुळे वायकर यांची कन्यादेखील कारवाईच्या कचाटय़ात सापडण्याची चिन्हे आहेत.
एकीकडे ईव्हीएम घोटाळ्याचे कारस्थान दडपण्याचा प्रयत्न होत आहे. दुसरीकडे शिवसेनेबरोबर अपक्ष आणि इतर पक्षाच्या उमेदवारांनी घोटाळ्याच्या नवनव्या धक्कादायक बाबींचा उलगडा करून मिंधे टोळीला जेरीस आणले आहे. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार, तक्रारदार भरत शाह यांनी सोमवारी केलेल्या गंभीर आरोपाने खळबळ उडाली आहे. त्यांनी मतमोजणी केंद्रातील वायकर यांची कन्या प्राजक्ता व मेहुणा मंगेश पंडलेकरच्या कारस्थानाची पोलखोल केली आहे.
शाह यांनी केलेले इतर आरोप
पेशाने वकील असलेली प्राजक्ता ही वायकर यांची मुख्य ‘पोलिंग एजंट’ होती. मतमोजणी केंद्रात ती दुपारी 2 वाजल्यापासूनच मोबाईल वापरत होती. हातातील पॅडखाली मोबाईल लपवत होती व अधूनमधून बाहेर अपडेट देण्यासाठी बाजूला जाऊन फोनाफोनी करीत होती. तिनेच काही वेळाने स्वतःकडील मोबाईल तिच्या मामाकडे, मंगेश पंडलेकरकडे दिला.
मोबाईल वापराचा हा गंभीर मुद्दा मी व सुरिंदर अरोरा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणला. त्यांनी प्राजक्ता व पंडलेकरला समज देण्याचा दिखावा केला व आम्हाला बाहेर जाऊन पोलिसांकडे तक्रार द्यायला सांगितले. वास्तविक त्यांनी तातडीने एफआयआर घेण्यासाठी पोलिसांना पत्र द्यायला हवे होते. त्यांनी जाणूनबुजून विलंब केला.