
>> रविप्रकाश कुलकर्णी
सातारा येथील 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास गेलो होतो. दिल्लीचं साहित्य संमेलन म्हणजे दोन कमी 100 असं संमेलनाध्यक्षा तारा भवाळकर यांनी म्हटल्यानंतर आता पुढचं संमेलन शंभराव्या संमेलनाशी नातं सांगणार असणार हे ओघानंच आलं. साहित्य संमेलनाच्या शंभर वर्षांच्या इतिहासात 1 जानेवारी ते 4 जानेवारी काळात भरलेले हे असे एकमेव संमेलन.
हे सगळं सातारा येथील साहित्य संमेलनाचा वृत्तांत सांगण्यासाठी सांगत नाही. सांगायचं आहे ते वेगळंच. साहित्य संमेलन म्हणून जे काही घडत आहे तोच ढाचा कमी-जास्त प्रमाणात यापुढे कायम असणार. त्याचवेळी साताऱ्याच्या बाजूला पालीला दोन-दोन लाखांची खंडोबाची जत्रा बिनबोभाट पार पडते आणि त्याच वेळी साहित्याच्या नावाने भरलेली तुलनेत एवढीशी असलेली साहित्याची जत्रा कशी दिसते? काही काही चांगल्या दिशेने जाणार घडतंय नक्की, पण… आमच्या साहित्य व्यवहाराला दाखवलेला हा असा आरसा आहे. काहीतरी चुकतंय एवढं खरं, पण अशा वेळी आपल्या आरती प्रभूंची साद येते-
दुःख वा आनंदही अन् अंत ना आरंभ ही
नाव आहे चाललेली, कालही अन् अन् आजही
तर आहे हे असं आहे
अर्थात याचा अर्थ सगळाच अंधार आहे असं अजिबात नाही. एवढे एवढेसे कवडसे दिलासा देणारे दिसले. त्यातलीच एक गोष्ट.
आपल्याकडे स्वामीत्व हक्क-कॉपीराईट याबाबत आपण फारसे काही सावध नाही. व्हाट्सआप आणि ते मेसेज फॉरवर्ड करणे याला तर काही धरबंदच नाही. लेख, कविता उचलायच्या आणि बिनदिक्कत कुणाच्या तरी नावाने किंबहुना स्वतच्या नावावर फिरवायच्या हा कृष्ण उद्योग अनेक जण करताना दिसतात. बहावा नावाची सुंदर कविता इंदिरा संतांच्या नावावर फिरताना दिसते. वास्तविक ती दिपाली ठाकूर यांची आहे. पण आपली कविता इंदिरा संतांच्या तोडीची आहे यावर त्यांनी समाधान मानून त्या गप्प बसल्या असाव्यात.
त्यानंतर खाद्य संस्कृतीवरचा एक लेख पु. ल. देशपांडे यांच्या नावावर आंतरजालावर फिरू लागला. वास्तविक तो लेख सातारच्या सीमंतिनी नूलकर यांचा होता, पण पुलंच्याच नावावर आपला लेख जातोय म्हणून सुरुवातीला त्यांनी फारशी खळखळ न करता नंतर खुलासा केला. पण नंतर हाच लेख तिसऱ्याच एका व्यक्तीने स्वतच्या नावाने डकवून फॉरवर्ड केला. फॉरवर्ड केलेली गोष्ट कोणी केली याचा शोध घेणे मोठी गोष्ट असते, पण लेखिका नूलकर यांना याचा सुगावा लागला. त्यांनी ढापू तथाकथित लेखकाला नोटीस पाठवली. दरम्यान बरीच भवती न भवती झाली.
पण लेखिका नूलकर यांना याचा सोक्षमोक्ष न्यायालयातर्फेच करून हवा होता.
शेवटी आश्चर्य म्हणजे हे प्रकरण कोर्टात रेंगाळत न राहता मिटलं. ढापू लेखकाने माफीनामा लिहून दिला.
सातारा येथे लेखिका नूलकर यांची गाठ भेट झाल्यावर ही हकिगत कळली. या संबंधात लवकरच त्या लिहिणार आहेत. तेव्हा अधिक काही कळेलच. तेव्हा जाता साताऱ्याला हे पण कळलं.































































