
मुंबईतील शीव, राजावाडी, केईएम, जे. जे. रुग्णालयात रेबीजवरचे इंजेक्शनच गेल्या दीड महिन्यापासून उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे मुंबईत रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे उघड झाले असून एखाद्याला कुत्रा चावला तर त्याला खासगी रुग्णालयात हे महागडे इंजेक्शन घ्यावे लागणार आहे.
पवई येथे राहाणाऱ्या एका 48 वर्षीय व्यक्तीला कुत्रा चावल्यानंतर पालिका रुग्णालयात तातडीने उपचार मिळाले नाही. सर्व रुग्णालयांत आपल्याकडे रेबीजप्रतिबंधक इंजेक्शन उपलब्ध नसल्याचेच उत्तर मिळाले. तब्बल 12 तासांहून अधिक काळ या व्यक्तीची इंजेक्शन मिळवण्यासाठी अक्षरशः वणवण झाली. या व्यक्तीला सकाळी साडेसातच्या सुमारास कुत्रा चावला, परंतु सायंकाळी साडेसातपर्यंत त्यांना इंजेक्शन मिळाले नव्हते.
पवई येथे राहाणारे नंदकुमार खैरे यांना सकाळी साडेसातच्या सुमारास कुत्रा चावला. प्रचंड रक्तस्राव सुरू झाल्याने त्यांच्या जखमेवर हळद लावण्यात आली. त्यानंतर त्यांचे मित्र मंगेश म्हस्के यांनी खैरे यांना घेऊन सर्वात आधी संघर्ष नगर येथील पालिकेच्या दवाखान्यात धाव घेतली, मात्र तिथे इंजेक्शन उपलब्ध नव्हते. त्यानंतर त्यांनी राजावाडी रुग्णालय गाठले. तिथे त्यांना जखम साबणाने धुण्यास सांगितले. तेथील वॉशरूमची अवस्था अत्यंत घाणेरडी होती, असे म्हस्के यांनी सांगितले.
साबणही उपलब्ध नव्हता. अखेर शॅम्पूने त्यांनी जखम स्वच्छ धुतली. त्यानंतर त्यांच्या दोन्ही हातांना आणि कमरेला टीटीचे इंजेक्शन देण्यात आले. त्यांच्याकडेही रेबीजवरचे इंजेक्शन उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांनी शीव रुग्णालयात जाण्यास सांगितले, पण तिथेही इंजेक्शन मिळाले नाही.
कुत्रा चावल्यानंतर लवकरात लवकर रेबीजप्रतिबंधक इंजेक्शन घेणे गरजेचे आहे. अन्यथा रेबीजचे विषाणू संपूर्ण शरीरात पसरण्याचा धोका असतो. प्रसंगी रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो, अशी माहिती फॅमिली फिजिशयन डॉ. संजीव कुदळे यांनी दिली.
रुग्णालयाचा नंबर ऑनलाइन शोधण्यास सांगितला
शीव रुग्णालयातील डॉक्टरांनीच केईएम किंवा जे. जे. रुग्णालयाशी संपर्क साधून तिथे इंजेक्शन उपलब्ध आहे की नाही, याबाबत विचारावे अशी विनंती म्हस्के यांनी केली, परंतु रुग्णालयांचा दूरध्वनी क्रमांक ऑनलाइन शोधावा असा अजब सल्ला त्यांनी दिला तसेच त्यांच्याशी संपर्क करून देणे हे काही माझे काम नाही, असेही ते डॉक्टर म्हणाले.
युवासेना जाब विचारणार
रेबीजसह आणखी कुठल्या महत्त्वाच्या इंजेक्शनचा तसेच औषधांचा साठा उपलब्ध नाही. रुग्णांच्या जिवाशी खेळ का सुरू आहे? याप्रकरणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. मंगला गोमारे यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. आता युवासेना सोमवारी त्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत जाब विचारणार असल्याचे युवासेना वरळी विधानसभा विभाग अधिकारी संकेत सावंत यांनी सांगितले.