अभ्युदयनगर पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागणार, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; अटी शिथील करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन   

काळाचौकी येथील अभ्युदयनगर वसाहतीच्या पुनर्विकासात रहिवाशांना 635 चौरस फुटांची घरे मिळतील, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. म्हाडाने आतापर्यंत सहा वेळा निविदा काढूनही एकही विकासक एवढय़ा फुटांची घरे देण्यासाठी पुढे आलेला नाही. त्यामुळे म्हाडाने घातलेल्या जाचक अटी शिथील करा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधानसभेत केली. दरम्यान, पुनर्विकासासंदर्भातील अटी शिथील करून पुन्हा टेंडर काढू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

पुनर्विकासाबाबत सरकारने सी अॅण्ड डी एजन्सीमार्फत धोरण घोषित केले व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी)ची नेमणूक करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, ती न झाल्यामुळे आमदार अजय चौधरी यांनी म्हाडा अधिकाऱयांकडे वारंवार पाठपुरावा करून पीएमसीची नेमणूक केली. त्याचबरोबर सरकारने निविदा काढण्यासाठी पाठपुरावाही केला.

रहिवाशांचे लाक्षणिक उपोषण  

अभ्युदयनगरच्या पुनर्विकासाबाबत सी अॅण्ड डी एजन्सीकडून होणाऱया दिरंगाईकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आज अभ्युदयनगरचा राजा चौकात रहिवाशांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन केले. यावेळी अभ्युदयनगर महासंघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मोदेकर, सरचिटणीस हेमंत पांचाळ, माजी नगरसेवक दत्ता पोंगडे, शाखाप्रमुख जयसिंग भोसले, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्मिता चौधरी, महासंघाचे दिलीप बने, महेश वाडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय झांजुरे, उमेश येवले यांच्यासह शेकडो रहिवासी उपस्थित होते.