
शहरात सुरू असलेला धोकादायक इमारतींचा पुनर्विकास महापालिकेला अक्षरशः पावला असून महसुलात विक्रमी वाढ झाल्याने नगर रचना विभाग मालामाल झाला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात नगर रचना विभागाने ३४५ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र प्रत्यक्षात या विभागाने ५४१ कोटी ८४ लाख रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. पुनर्विकासाचे वारे वेगात वाहू लागल्यामुळे नगर रचना विभागाच्या महसुलात गेल्या चार वर्षांपासून लक्षणीय वाढ होत चालली आहे.
नवी मुंबई शहरातील धोकादायक इमारतींचा गेल्या ३० वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मार्गी लागला. महाविकास आघाडी सरकारने पुनर्विकासात अडथळा ठरणाऱ्या जाचक अटी काढून टाकल्यानंतर नवी मुंबईतील पुनर्विकासाला गती आली आहे. त्यामुळे सध्या शहरात सुमारे २७ पॉकेटमध्ये धोकादायक इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. शेकडो प्रकल्पांची पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. परिणामी नगर रचना विभागाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नगर रचना विभागाला ३४५ कोटींचे टार्गेट दिले होते. मात्र सहाय्यक नगर रचना संचालक सोमनाथ केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली ५४१ कोटी ८४ लाख रुपयांचा महसूल या विभागाने जमा केला आहे.
- या भरीव कामगिरीमुळे नगर रचना विभागाचे महापौर सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
- सोमनाथ केकाण यांनी नगर रचना विभागाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर प्रत्येक वर्षी या विभागाने दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त महसूल जमा केला आहे. २०२० पूर्वी नवी मुंबईतील पुनर्विकासासाठी फार जाचक अटी टाकण्यात आल्या होत्या.
- त्यामुळे पुनर्विकासाची एक वीट रचली गेली नव्हती. मात्र आता ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत सर्वत्र पुनर्विकासाचे प्रकल्प उभे राहू लागले आहेत.
८७६ कोटींचा मालमत्ता कर जमा
नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यंदा रेकॉर्डब्रेक कामगिरी करून ८७६ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. या विभागाचे प्रमुख उपायुक्त अमोल पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी अनेक योजना तयार करण्यात आल्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे मालमत्ता कराची रेकॉर्डब्रेक वसुली झाली. या विभागाचेही महापौर आणि आयुक्तांनी अभिनंदन केले आहे.




























































