जम्मू-कश्मीरमधील १४ पर्यटन स्थळे पुन्हा होणार खुली; पहलगाम हल्ल्यानंतर बंद करण्यात आली होती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधील पर्यटनाला पुन्हा गती देण्यासाठी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. केंद्रशासित प्रदेशातील बंद असलेली १४ पर्यटन स्थळे तात्काळ प्रभावाने पुन्हा खुली करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. सुरक्षिततेचा सर्वंकष आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून काही पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्यात आली होती. अलिकडेच पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत (UHQ Meeting) परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर उपराज्यपालांनी यातील १४ प्रमुख ठिकाणे पर्यकांसाठी खुली करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये कश्मीर खोऱ्यातील ११ आणि जम्मू विभागातील ३ महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा समावेश आहे.

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती देताना सांगितले की, “सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पर्यटकांच्या सोयीसाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी ही स्थळे खुली केली जात आहेत.” काही ठिकाणची बर्फवृष्टी कमी झाल्यानंतर उर्वरित स्थळे देखील टप्प्याटप्प्याने खुली केली जातील, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जम्मू-कश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असून, हॉटेल व्यावसायिक, गाईड्स आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.