पुतळ्यात प्राण फुंकणारा जादूगार…

राम सुतार हे केवळ दगड-मातीला आकार देणारे शिल्पकार नव्हते, तर दगड-मातीच्या रुपातील पुतळ्यांत प्राण फुंकणारे जादूगार होते. शतायुषी होण्याचे भाग्य लाभलेल्या सुतार यांचा कलाविष्कार डोळे दिपवून टाकणारा होता. त्यांच्या निधनामुळे दगडाचे सोने करणारा ’परिस’ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

धुळे जिह्यातील गोंदूर गावातून राम सुतार यांच्या कलेचा प्रवास सुरू झाला. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा हा प्रवास सुरू होता. त्यांच्या शिल्पकलेने जग पादाक्रांत केले. त्यांनी साकारलेली शिल्पे हिंदुस्थानसह जगातील 450 शहरांत पोहोचली. राम सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी गोंदूर या खेडेगावी अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचे बालपण अतिशय खडतर व संघर्षमय परिस्थितीत गेले. बालपणापासूनच सुतारांच्या हाताला प्रतिभेचा स्पर्श होता. त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे ते मुंबईत सर. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे शिक्षणासाठी आले. तिथे चमकदार कामगिरी करून त्यांनी मेयो सुवर्णपदक पटकावले. पुढे 1954-58 दरम्यान संभाजीनगर येथे वेस्टर्न सर्कल येथील पुरातत्त्व विभागात नोकरी करीत असताना त्यांनी अजिंठा व वेरुळ येथील अनेक शिल्पांच्या जीर्णोद्धाराचे काम पाहिले. ते नवी दिल्लीत माहिती व प्रसारण मंत्रालयातील दृश्राव्य प्रसिद्धी विभागात तांत्रिक सहाय्यक (1958- 59) या पदावर कार्यरत होते. तिथून राजीनामा देऊन त्यांनी पूर्ण वेळ शिल्पकार होण्याचे ठरविले. दगड आणि संगमरवरातील शिल्पकामात त्यांचा हातखंडा असला तरी त्यांना ब्राँझ धातूत शिल्पकाम करण्याची विशेष आवड होती. त्यांची बहुतेक प्रसिद्ध कामे ब्राँझ धातूमध्येच आहे. स्मारकशिल्पे बनविण्यात त्यांची मुख्यत्वे ख्याती होती.

94 व्या वर्षी साकारला जगातील सर्वात उंच पुतळा

’लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वात उंच पुतळा साकारण्याचे आव्हान त्यांनी पेलले. गुजरातमध्ये नर्मदेच्या सरदार सरोवर धरणासमोर उभा राहिलेला हा पुतळा तब्बल 597 फूट उंचीचा आहे. या पुतळ्यासाठी देशभरातील नामवंत शिल्पकारांनी डिझाईन बनवून पाठवले होते; मात्र इतिहासकार, शिक्षणतज्ञ आणि कलाकारांच्या एका समितीने राम सुतार यांच्याच डिझाईनची निवड केली. सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच 597 फूट उंचीचा पुतळा साकारण्यात त्यांच्या शिल्पकलेची आणि कल्पकतेची कसोटी लागली. सुतार कास्टिंग सुरू असताना प्रत्यक्ष उभे राहून पाहणी करत. त्यावेळी त्यांचे वय चौऱयाण्णव वर्षांचे होते.

संसदेच्या आवारात राष्ट्रपुरुषांचे पुतळे

सुतार यांना सरकारने हिंदुस्थानी नेत्यांची शिल्पे बनविण्यासाठी अधिकृत शिल्पकार म्हणून नेमले होते. त्यांनी बनविलेली हिंदुस्थानी नेत्यांची ब्राँझमधील शिल्पे संसद भवन आणि अन्य महत्त्वपूर्ण शासकीय इमारतींत तसेच विविध शहरांत स्थापित केलेली आहेत. दिल्लीतील रफी मार्गावरील गोविंद वल्लभ पंत यांचे 10 फुटी शिल्प म्हणजे सुतार यांचे अद्वितीय काwशल्य, प्रतिभा आणि अचूकता यांचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यांनी बनविलेल्या इतर प्रसिद्ध शिल्पांत महात्मा गांधी विथ हरिजन किड्स 13 फुटी, महाराजा रणजितसिंह यांचा अमृतसर येथील 21 फुटी पुतळा, गंगा-यमुना देवींचे लुधियाना येथील शिल्प समाविष्ट आहेत. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित दीनदयाळ उपाध्याय, रफी अहमद किडवई आदींच्या शिल्पाकृती दिल्ली, नैनिताल, लखनौ, लुधियाना, भरतपूर वगैरे ठिकाणी पाहता येतात. जपानची राजधानी टोकियो येथील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळाही सुतार यांनीच घडवलेला आहे.

गाजलेले पहिले शिल्प

गांधीसागर धरणावरील चंबल हे राम सुतार यांचे अत्यंत गाजलेले श्लिप होय. हे 45 फुटी शिल्प एकाच साच्यात कोरलेले असून चंबल माता आपल्या दोन मुलांसह यात दाखविलेली आहे. ज्यातून मध्य प्रदेश व राजस्थान या दोन राज्यांमधील भ्रातृभाव प्रतीत होतो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना हे काम इतके आवडले, की त्यांनी भाक्रा नानगल धरणावर 50 फूट उंचीचे ब्राँझमधील स्मारकशिल्प ट्रायम्फ ऑफ लेबर बनविण्यास त्यांना सांगितले. ज्या कामगारांनी हा प्रकल्प पूर्ण करताना आपले प्राण पणास लावले, त्यांच्या स्मरणार्थ हे शिल्प उभारण्यात येणार होते. मात्र पुरेशा निधीच्या अभावी ते अपूर्ण राहिले.

जय जय महाराष्ट्र माझा…

14 नोव्हेंबर 2025 रोजी राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वयाची शंभरी पार केलेल्या राम सुतार यांना प्रकृती ठीक नसल्याने नोएडा, उत्तर प्रदेश येथील निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. अनेक दशके महाराष्ट्राबाहेर कार्यरत राहिलेल्या राम सुतार यांच्या मनात महाराष्ट्राविषयी, मराठी मातीविषयी अपार प्रेम आणि अभिमान होता.

राम सुतार यांच्या निधनाने अतीव दुःख झाले आहे. एक प्रतिभावंत शिल्पकार, ज्यांच्या काwशल्यामुळे देशाला  केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीसह अनेक प्रतिष्ठत स्मारके लाभली.  त्यांच्या कलाकृती म्हणजे इतिहासाची, संस्कृतीची प्रभावशाली अभिभक्ती आहेत. त्यांचे कार्य येणाऱया पिढय़ांसाठी प्रेरणादायी राहील. त्यांचे कुटुंबीय, चाहते आणि त्यांच्या उल्लेखनीय कार्याने प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझ्या सहवेदना.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान   

जगातले महान शिल्पकार आज हरपले. त्यांच्या कलाकृती निव्वळ अविश्वसनीय आहेत.  शिल्पकलेत त्यांनी इतिहास घडवला. संसद भवनातील महात्मा गांधीचे रफ पॅचवर्कमधील शिल्प हा त्यांच्या कलेचे उत्कृष्ट नमुना आहे. सुदैवाने मला त्यांचे आशीर्वाद लाभले. तुमचे जे प्रोफेशनल वर्क असते, तेच तुमचे एक्झिबिशन असते.  जिथे जिथे तुमची शिल्पं उभी राहतात, तेच तुमचे देशासाठीचे प्रदर्शन असते, असे  ते म्हणायचे.

विनय वाघ, शिल्पकार