
हिंदुस्थानात वृद्धांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2023 मध्ये 60 वर्षांवरील लोकसंख्या 9.7 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. केरळमध्ये हे प्रमाण सर्वाधिक 15.1 टक्के इतके आहे, अशी माहिती रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या अहवालातून उघड झाली आहे. केरळनंतर तामीळनाडू (14 टक्के) आणि हिमाचल प्रदेश (13.2 टक्के) आहे. 1971 मध्ये देशाचा एपूण प्रजनन दर 5.2 होता, तो 2023 मध्ये कमी होऊन 1.9 इतका झाला आहे. दिल्लीतील ग्रामीण भाग वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शून्य ते 14 वर्षे वयोगटातील मुलांची संख्या मुलींपेक्षा जास्त आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
1971-81 दरम्यान 0 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांची लोकसंख्या 41.2 टक्क्यांवरून 38.1 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. 1991 ते 2023 दरम्यान ती आणखी कमी होऊन 24.2 टक्के इतकी झाली. म्हणजेच गेल्या 50 वर्षांत मुलांचा वाटा सुमारे 17 टक्क्यांनी कमी झाला आहे. मुलांची संख्या कमी होत असल्याने भविष्यात कामगारांची संख्या कमी होईल. आर्थिक विकास मंदावण्याची शक्यता आहे. यामुळे एक मूल किंवा मूल नसलेली कुटुंबे वाढू शकतात. वृद्धांची काळजी घेण्यासाठी कमी लोक असतील. प्रति मुलासाठी गुंतवणूक वाढू शकते. म्हणजेच चांगले शिक्षण आणि आरोग्य यावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते.
बालमृत्यू घटले
देशात होणाऱ्या बालमृत्यूमध्ये घट झाली आहे. 2023 मध्ये देशातील बालमृत्यू दर 25 पर्यंत कमी झाला आहे. 2013 मध्ये बालमृत्यू दर 40 इतका होता. म्हणजेच 10 वर्षांत तो 37.5 टक्क्यांनी कमी झाला आहे. ही माहिती देशाच्या रजिस्ट्रार जनरलने जारी केलेल्या नमुना नोंदणी प्रणाली अहवाल 2023 मध्ये देण्यात आली आहे. बालमृत्यू दर हा कोणत्याही देशाच्या आरोग्य सेवांची स्थिती दर्शविणारा एक महत्त्वाचा पॅरामीटर आहे. बालमृत्यू दर कमी व्हावे यासाठी सरकारी पातळीवर जनजागृती आणि उपाययोजना केल्या जात आहेत.