खेकडे पकडायला गेले अन् टेकडीवर अडकले, जवानांनी केली पाच मुलांची सुटका

खेकडे पकडायला गेलेल्या पाच मुलांची मुंब्रा खडी मशीन धरणाजवळील टेकडीवरून सुखरुप सुटका करण्यात आली. एनडीआरएफचे पथक, अग्नीशमन दलाचे जवान आणि मुंब्रा पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवत मुलांना टेकडीवरून आणले. मुलांची सुटका केल्यानंतर स्थानिकांनी एनडीआरएफ, अग्नीशमन दल आणि मुंब्रा पोलिसांचे आभार मानले.

‘टाईम्स नाऊ’ने सध्या पावसाळा असल्याने पाच मुलांचा ग्रुप मुंब्रा खडी मशीन धरणाजवळील टेकडीवर खेकडे पकडायला गेला होता. मात्र तेथे ते अडकले. रात्री साडेआठच्या दरम्यान अग्नीशमन दलाला काही मुलं टेकडीवर अडकल्याची माहिती मिळाली.

यानंतर अग्नीशमन दलासह एनडीआरएफचे पथक, मुंब्रा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफ आणि अग्नीशमन दलाने बचावकार्य हाती घेत पाचही मुलांची टेकडीवरुन सुटका केली. पाचही मुले सुरक्षित असल्याचे अग्नीशमन दलाचे अधिकारी गणेश केदारे यांनी सांगितले.