कणकवली तालुक्यातील 64 ग्राम पंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर; 33 पंचायतींवर येणार महिलाराज

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार व निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कणकवली तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. तालुक्यातील 64 पैकी 33 ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यात अनुसूचित जातीसाठी 5 ग्रामपंचायती राखीव असून त्यातील 3 महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. नागरिकांच्या मागास प्रवगार्साठी 17 ग्रामपंचायती आरक्षित असून त्यातील 9 महिलांसाठी तर खुल्या प्रवर्गातील 42 पैकी 21 ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. नव्या अरक्षणामुळे अनेक विद्यमान सरपंचांचे पत्ते कट झाले आहेत.

कणकवली नगरवाचनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात रितेश पाटील व भार्गवी केळुसकर या दोन विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी उचलून आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे, निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव, संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, विजय वरक, संभाजी खाडये, सत्यवान माळवे, मनीषा बोडके आदी उपस्थित होते. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार 5 ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी नवीन कुर्ली, वाघेरी, शिरवल तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पिसेकामते, दारिस्ते ग्रामपंचायत आरक्षित झाली आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 17 ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. यापैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी 9 जागा आहेत. कलमठ, लोरे नंबर 1, वागदे, हरकुळ बुद्रूक, जानवली, आशिये, नरडवे, नडगिवे, खारेपाटण या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर नागरिकांचा मागास प्रवगार्साठी 8 ग्रामपंचायती आरक्षित झाल्या असून ओटव, ओझरम, ओसरगाव, कासार्डे, वरवडे, फोंडाघाट, बोर्डवे, आयनल यांचा समावेश आहे.

सर्वसाधारण प्रवगार्साठी 42 ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. त्यात सर्वसाधारण महिलांसाठी 21 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 2020-25 या कालावधीत सर्वसाधारण महिला आरक्षण नसलेल्या 25 ग्रामपंचायतींची निवड करून त्यापैकी 21 ग्रापंचायतींसाठी चिठ्ठीद्वारे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्या. त्यामध्ये असलदे, कळसुली, कसवण-तळवडे, कोंडये, कोळोशी, तळेरे, गांधीनगर, डामरे, तिवरे, नांदगाव, शिवडाव, सांगवे, साळिस्ते, बेळणे खुर्द, तरंदळे, भरणी, चिंचवली, नाटळ, शिडवणे, घोणसरी, कुरंगवणे -बेर्ले या ग्रामपंचायतींच्या समावेश आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये करंजे, करूळ, तोंडवली-बावशी, दारूम, भिरवंडे, माईण, वारगाव, शेर्पे, हरकुळ खुर्द, सातरल, हुंबरट, हळवल, पियाळी, साकेडी, दिगवळे, कासरल, कुंभवडे, नागवे, बिडवाडी, वायंगणी, सावडाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.