
गोरेगाव-मुलुंड रोडच्या कामामुळे ओबेरॉय मॉल जंक्शनचा सिग्नल गेल्या शनिवारपासून वाहतूक पोलिसांनी बंद केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करावा लागतोय. परिणामी येथे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बंद केलेला सिग्नल त्वरित सुरू करावा, अशी मागणी शिवसेनेने दिंडोशी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
गोरेगाव-मुलुंड रोडच्या कामामुळे जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावरील ओबेरॉय मॉल जंक्शनचा सिग्नल वाहतूक पोलिसांनी बंद केला आहे. या मार्गावरून गोरेगाव रेल्वे स्थानक तसेच मुंबई, नवी मुंबई, मीरा-भाईंदर सर्व ठिकाणी रोज मोठय़ा संख्येने बेस्टच्या बसेस जातात. त्यामुळे बस पकडण्यासाठी प्रवाशांना तसेच येथील शिवधाम कॉम्प्लेक्स, दिंडोशी म्हाडा वसाहत आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांनासह विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करावा लागतो. त्यामुळे बंद केलेला सिग्नल त्वरित सुरू करावा अशी मागणी शिवसेनेचे दिंडोशीचे विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांनी दिंडोशीच्या वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना एका पत्राद्वारे केली आहे.
जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडण्याची वेळ
गोरेगाव–मुलुंड रोडच्या कामामुळे रस्ता आधीच छोटा झाला आहे. दररोज या मार्गावरून हजारो वाहने ये–जा करतात. विकेण्डला मॉलमध्ये मोठय़ा प्रमाणात नागरिक व वाहने येतात. आता येथील सिग्नल बंद केल्याने वाहने सुसाट वेगाने जातात. त्यामुळे पादचाऱ्यांना आणि नागरिकांना धोका पत्करून रस्ता क्रॉस करावा लागत असल्याचे दिंडोशी वृंदावन सोसायटीचे अध्यक्ष संतोष नाझरे यांनी सांगितले.