
रेल्वेच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांदीचे नाणे देण्याची प्रथा आहे. मात्र यापुढे रेल्वेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना चांदीचे नाणे दिले जाणार नाही. चांदीच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि या संपूर्ण प्रक्रियेत झालेला भ्रष्टाचार, ही या निर्णयामागची मुख्य कारणे मानली जात आहेत. मध्य प्रदेशातून नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला होता, तेथे निवृत्तीवेळी देण्यात आलेली चांदीची नाणी भेसळयुक्त आढळली. तपासणीत या नाण्यांमध्ये चांदीचे प्रमाण अत्यंत कमी असून ती प्रामुख्याने तांब्याची आढळली.
खरेदी प्रक्रियेत झालेल्या या गैरव्यवहारामुळे अखेर ही परंपराच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वे बोर्डाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना गोल्ड कोटेड चांदीचे नाणे अथवा पदक देण्याची परंपरा आता संपुष्टात आली आहे. ज्या रेल्वे विभागांकडे नाण्यांचा साठा शिल्लक आहे, त्याचा योग्य हिशोब ठेवून त्यांचा वापर अन्य उपक्रमांसाठी करावा, असे म्हणण्यात आले आहे. ही परंपरा मार्च 2006 मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी 20 ग्रॅम वजनाच्या या चांदीच्या नाण्याची किंमत सुमारे 1,000 रुपये होती. आता चांदीच्या किंमती खूप वाढल्या आहेत. तसेच बाहेरील वेंडर्सकडून विकत घेतलेल्या नाण्याची क्वालिटी योग्य नव्हती.


























































