रॉयटर्स वृत्तसंस्थेचे एक्स अकाउंट ब्लॉक; याबाबत कोणतेही निर्देश दिले नसल्याची केंद्राची माहिती

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सचे अधिकृत एक्स हँडल हिंदुस्थानात ब्लॉक झाले आहे. हे हँडल ब्लॉक झाल्याने देशात पुन्हा एकदा पत्रकारिता आणि डिजिटल स्वातंत्र्याबाबत चर्चा होत आहेत. आता याबाबत केंद्र सरकारने निवेदन जारी केले आहे. आम्ही हे एक्स हँडल ब्लॉक करण्याबाबत कोणताही आदेश दिलेला नाही, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारला रॉयटर्सचे हँडल ब्लॉक करण्याची गरज नाही. सरकारने याबाबत कुठलेही निर्देश दिलेले नाहीत. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही X सोबत सतत संपर्कात आहोत. रविवार सकाळपासून रॉयटर्सच्या एक्स हँडलवर कायदेशीर विनंतीला प्रतिसाद म्हणून हे खाते हिंदुस्थानात बंद करण्यात आले आहे, असा संदेश दिसत आहे. त्यामुळे याची चर्चा होत आहे. सरकारने X शी संपर्क साधून हा ब्लॉक काढून टाकण्यास सांगितले आहे.