मी पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होतो, ‘26/11’च्या हल्ल्याबाबत राणाची कबुली

‘26/11’च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा आता पोपटासारखा बोलू लागला आहे. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या कोठडीत झालेल्या चौकशी दरम्यान राणाने आपण पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होतो, अशी कबुली दिली आहे. तसेच आखाती युद्धादरम्यान आपल्याला सौदी अरेबियामध्ये पाठवण्यात आल्याचेही त्याने सांगितले. दिल्लीतील तिहार तुरुंगात तपास यंत्रणांना चौकशी दरम्यान राणाने अनेक खुलासे केल्याचे सांगितले जात आहे.

तो आणि त्याचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडलीने पाकिस्तान येथील दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाबरोबर अनेक प्रशिक्षण सत्रे घेतली होती, असे सांगतानाच लश्कर-ए -तोयबा ही केवळ दहशतवादी संघटना नसून ती गुप्तहेर संघटनेसारखी काम करते, असा गौप्यस्फोटही राणाने केला.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसह मुंबईतील विविध महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांची रेकीही केली होती, अशी कबुलीही राणाने दिली.

हल्ल्यावेळी मुंबईत होता

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्या वेळी आपण मुंबईत उपस्थित होतो आणि या दहशतवादी कटामध्ये सहभागी होतो, असेही राणाने चौकशी दरम्यान कबूल केल्याचेही समोर आले आहे.