परीक्षण – जगण्याचं तत्त्व आणि सत्त्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुधाकर वसईकर

अदिती काळमेख यांचा ‘जगणे गोंदून घेताना’ या अनिश प्रकाशन प्रकाशित संग्रहातील कविता वाचताना या कविता प्रामाणिक आहेत आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी नव्हे तर त्या सिद्धी प्राप्तीसाठी लिहिल्या आहेत, हे जाणवत राहतं. या कविता संग्रहातील सगळ्या कविता म्हणजे कवयित्रीचे जगणे आहे. कवयित्री व्यवसायाने डॉक्टर असल्याने प्राक्टीस करताना त्यांना भेटलेली माणसे, त्यांच्या जाणिवा, त्यांची सुखदु:खे, त्यांचे मानसिक ताणतणाव कवयित्री ऐकते, पाहते. हळूहळू त्यात स्वत: गुंतत जाते. स्वतला समतल पातळीवर तपासत जाते याची प्रचीती सुरुवातीच्या, ‘कविता’, ‘कॅलेंडर’ कवितांमधून येते. कवयित्री लिहिते,

मनाचं तीळतीळ मरणं आणि
कायमसाठी अस्तित्व संपणं
यात तसा अर्थाअर्थी फरक असतो?

आणि मग त्यातून सुरू होतं जगणं गोंदून घेणं. हे जगणं कवयित्रीचं तर आहेच पण आसपासच्या माणसांचंही आहे. इतरांचं जगणं गोंदून घेताना ज्या ओळी आल्या त्या कवयित्री आज अभिमानानं मिरवीत असेलही, पण ते जगणं गोंदून घेतानाचा त्रास तिनं झेललेला, भोगलेला जाणवतो, गोंदून घेण्याची प्रािढया वेदनादायी असते आणि ती बाह्यंगावर होत असली तरीही त्याची वेदना त्वचेच्या आत खूप खोलवर होत असते. गोंदलेलं मग विरत नाही. ही गोंदून घेण्याची प्रािढया अजून सुरू आहे असाही अर्थ या शीर्षकातून प्रतीत होतो.

या संग्रहात एकूण 56 कविता आहेत. त्यातील काही 13 कविता छंदोबद्ध आहेत तर 43 कविता मुक्तछंदात आहेत. या 56 कवितांत काही कविता सामाजिक जाणिवेच्या, काही स्त्राr जाणिवांच्या, काही व्यक्तिचित्रणाच्या आणि काही प्रेम कविता आहेत. या सगळ्यातून एक हळवेपण प्रवाहित होताना जाणवतं. त्यात एक सामाजिक भान दिसतं. व्यक्तिचित्र कविता अनेक वेळा त्या व्यक्तीचं गुणगान करत, त्या व्यक्तीला देवत्व देतात. ‘हे बुद्धा’, ‘थॅंक यू अमृताजी’, ‘इमरोज’, ‘चुलत सासू’ या कवितांतून त्या व्यक्तींनी आपल्याला काय दिले, हे खुबीने विषद करून सांगते. या सर्व कविता सकारात्मक आहेत.
या संग्रहातील 13 छंदोबद्ध कवितेतील लय, शब्दरचना आणि आशय यामुळे या कविता वाचताना ओव्यांचा आभास होतो. ओव्यातील हळुवार कथन, सखीला सांगतानाचे सख्य, हे सारे या लयबद्ध कवितांत जाणवते. त्यातील ग्रामीण शब्दयोजनेमुळे या कविता मुलायम होत जातात. ‘माहयार’ कवितेत मायलेकीच्या भेटीचं वर्णन करताना कवयित्री लिहिते,

सरता सरंना माहयाराची वढ
कसं जिरवू गं उरातलं कढ

कवितेत अशा ओळी येतात आणि आपण क्षणभर थांबतो आणि ती कविता पुन्हा वेगळ्या अंगानं वाचू लागतो. अदिती काळमेख यांच्या ‘जगणे गोंदून घेताना’ या संग्रहात, ‘रंग नसणंही रंगच’ किंवा ‘सांधे बदलताना होणारी कुरकुर, हे मात्र अटळ वास्तव!’ अशा ओळी फक्त कविता नसतात, त्या जगण्याचं तत्त्व आणि सत्त्व सांगतात.

कवयित्री अदिती काळमेख यांच्या कवितेत अनेक वेळा वेगळे शब्दयोजन आढळते. विशेष म्हणजे हे शब्दयोजन कृतक वा नियोजित वाटत नाही. त्यात ओघवतेपण असतं, कवितेच्या प्रवाहात ते प्रवाहित होत येतं आणि ते वाचताना वाचकाला अडखळायला होत नाही. ‘वाट डोळ्यातली’ कवितेत कवयित्री म्हणते, संपणार कधी ही, वाटुली डोळ्यातली. यात ‘वाटुली’ हा शब्द ओढळपणाचं दर्शन घडवतो. एखादी गोष्ट रोज पाहताना वा त्याबद्दल विचार करताना वा त्याच्याशी बोलताना हळूहळू आपण त्या गोष्टीशी निगडित होत जातो आणि त्याबाबत एक लव्हाळपण आपसूकच येऊ लागतं, ही बाब फक्त एका शब्दात कवयित्रीनं या ओळीत दर्शविली आहे. ‘रातंद्या’ या कवितेत,

किती टाचावे, कसे तुणावे, विश्वासाचे विरले पाटव
उधळून द्यावे काळावरती हट्टी नी मुजोर आठव

अशी शब्दरचना येते तर ‘अडोरेबल’ या कवितेत दागिने उतरवण्याची ािढया ‘एकेक अक्सेसरीज उतरवाना’ या प्रतिमेतून दर्शविली जाते. विहीरभूल, भंडारभोग, गोधडी, आठवसयी, ऐक सई, अडोरेबल, दळाण, हे बुद्धा, हंबरवाटा, बापमूर्ती, अंधार या कविता विशेष उल्लेखनीय आहेत.

संग्रहातील बहुतांशी कविता वाचनीय असून सुखद अनुभूती देतात. आपल्याला आपल्या गतकाळात नेतात, काही गोष्टी नव्याने सांगतात आणि काही गोष्टींची उकल करून दाखवतात. म्हणूनच ‘जगणे गोंदून घेताना’ हा संग्रह वाचनीय झाला आहे. मराठी वाचकांच्या पसंतीस उतरेल असे वाटते. संग्रहाचं सुंदर मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांचं असून आतील सुबक रेखाटने सागरनाथ गायकवाड यांची आहेत.

जगणे गोंदून घेताना
कवी : अदिती काळमेख
प्रकाशक : अनिश प्रकाशन
पृष्ठे : 132 मूल्य : 180 रुपये