
दापोलीतील हर्णे एसटी स्टँडमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. एसटी स्टँडमधील रस्त्यांवर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र सुस्त प्रशासन खड्डे बुजवण्याचे सोडून केवळ बघ्याची भूमिका निभावत आहे. हे खड्डे बुजवण्याची मागणी वारंवार प्रवाशांकडून होत आहे.
दापोली तालुक्यातील हर्णे मार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सतत एसटी बसेसच्या फेऱ्या दर तासाने सुरू असतात. दापोली, आसुद, हर्णे, पाजपंढरी, आंजर्ले, आडे, उटंबर, केळशी, मांदिवली मार्गावरील प्रवाशी खासगी वाहतुकीपेक्षा एसटी बसेसच्या प्रवासाला अधिक प्राधान्य देतात.
प्रशस्त जागेवर असलेल्या हर्णे एसटी स्टॅंडमध्ये सध्या महाकाय खड्ड्यांचा विस्तार हा वाढलेला आहे. त्यामुळे येथे एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांना या महाकाय खड्ड्यांना ओलांडूनच खड्डे तुडवत प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास प्रवाशांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे या एसटी स्टॅंडमधील महाकाय खड्डे लवकर बुजवावेत अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.