
भाजपच्या रितू तावडे या मुंबईच्या महापौर झाल्या. पण या महापौरपदावरून भाजपमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत मुंबई ते दिल्ली असे घणघोर राजकारण रंगले. रितू तावडे यांच्या ऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दुसऱ्याच नावाला पसंती दिली होती. मात्र, ऐनवेळस मोठा राजकीय खेळ झाला आणि रितू तावडे महापौर झाल्या. मुंबईचा महापौर कोण होणार? यावरून भाजपमध्ये मोठे रणकंदन झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. आणि सध्या भाजपमध्ये असलेला काँग्रेसचा माजी नेता कोण? यावर मसालेदार चर्चा झडत आहेत.
मुंबईचा महापौर बनवण्यासाठी निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच राजकारण सुरू झाले होते. याची सुरुवात शिंदे गटाकडून झाली. महापालिका निवडणुकीत भाजपला ८९ जागा मिळूनही शिंदे गटाकडून महापौरपदासाठी दबाव आणण्यात आला. मात्र, भाजपने शिंदे गटाला जागा दाखवत महापौर आपल्याच पक्षाचा होणार अशी भूमिका मांडली. यानंतर महापौरपदासाठी भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाले. आणि मुंबई ते दिल्लीपर्यंत राजकारण रंगले. पडद्यामागे रंगलेल्या या राजकारणाची काही माहिती सोशल मीडियातून समोर आली आहे.
रितू तावडे या आधी काँग्रेसमध्ये होत्या. आणि सध्या भाजपमध्ये असलेल्या काँग्रेसमधील माजी नेत्याने रितू तावडे यांना महापौर करण्यासाठी दिल्लीत ठाण मांडले होते. या नेत्याने दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींचे दरवाजे ठोठवले. एवढेच नव्हे तर मुंबईतील एका प्रभावी उद्योगपतीच्या साथीने या भाजप नेत्याने ऐनवेळी बाजी पलटवली, अशी चर्चा आहे. कारण मुंबईच्या महापौरपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून रितू तावडे यांच्या ऐवजी दुसऱ्या नावाला पसंती होती. या नावावर जवळपास शिक्कामोर्तब होणार होते. पण अखेरच्या क्षणी मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत मोठा खेळ खेळला गेला आणि रितू तावडे या महापौर झाल्या. यामुळे रितू तावडे यांच्यासाठी दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावणारा भाजपमध्ये असलेला काँग्रेसचा माजी नेता कोण? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

























































