
तारापूर एमआयडीसी परिसरातील बेकायदा पार्किंगने बोईसरमधील रस्ते हायजॅक केले आहेत. रस्त्याच्या कडेला तसेच अरुंद रस्त्यावर दुतर्फा केलेली बेशिस्त पार्किंग व बेकायदा वाहन थांब्यांमुळे नागरिक हैराण झाले असून त्यांना ट्रॅफिककोंडीचा ताप सहन करावा लागत आहे. प्रशासन या बेशिस्त आणि बेकायदा पार्किंगकडे कानाडोळा करत असल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप बोईसरवासीयांनी केला आहे.
औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या तारापूर एमआयडीसी परिसरातून दररोज हजारो वाहनांची वाहतूक सुरू असते. मात्र यशवंत सृष्टी परिसरातून मधुर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनांची पार्किंग केली जाते. त्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. कारखान्यांचा कच्चा व तयार माल वाहून नेणाऱ्या वाहनांबरोबरच खासगी वाहनेदेखील या वाहतूककोंडीत अडकून पडतात. त्यामुळे येथील नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. या औद्योगिक आस्थापनांची आवश्यक असलेली दहा टक्के म्हणजेच 38 हजार 309 चौरस मीटर क्षेत्रफळ राखीव ठेवून त्याठिकाणी वाहनतळे उभारण्यात आली आहेत. मात्र त्या वाहनतळांचा वापर होत नसल्याने तेथे बेकायदेशीर टपऱ्या उभारून उद्योगधंदे सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते वैभव जाधव यांनी केला आहे. याबाबत ठोस उपाययोजना करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे.





























































