फडणवीसांचे स्वप्न महाराष्ट्राला कंगाल करून जाण्याचे, वीज कंपनीच्या खासगीकरणावरून रोहित पवार यांची टीका

राज्यातील वीज प्रकल्पांचे खासगीकरण केले जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. तसेच खासगीकरणाच्या नावाने देवेंद्र फडणवीस राज्याला कंगाल करू पाहत आहेत असेही रोहित पवार म्हणाले.

आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) सोशल मीडिया अकांऊटवरून रोहित पवार यांनी पोस्ट केली आहे. पवार म्हणाले की ”कंत्राटीकरण-खाजगीकरण आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे या सरकारमधील गंभीर समीकरण आहे. उठसुठ खासगीकरण करण्याचा सपाटा लावणाऱ्यांकडून आता राज्यातील वीज प्रकल्पांचे खासगीकरण करून परराज्यातील कंपन्यांच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे” असा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच ”फडणवीस साहेब सत्तेच्या शेवटच्या काळात तरी महाराष्ट्राची वाट लावू नका. असो आपल्याकडे जलसंपदा आणि ऊर्जा दोन्ही खाते आहेत म्हणून आपण महाराष्ट्राला कंगाल करून जाण्याचे जे स्वप्न पाहात आहात ते राज्यातील जनता कधीच पूर्ण होऊ देणार नाही.”


”मविआ सरकार आल्यानंतर हा महाराष्ट्रविरोधी निर्णय तात्काळ मागे घेतला जाईल त्यामुळे भाजपला निवडणूक दक्षिणा देऊन सरकारी वीज प्रकल्प बळकावू पाहणाऱ्या कंपन्यांनी देखील या भानगडीत पडू नये आणि सरकारला खाजगीकरणाची एवढीच आवड आहे तर सरकारी प्रकल्पांचे खाजगीकरण करण्याऐवजी राज्यात खाजगी गुंतवणूक आणण्यासाठी आपली कौशल्ये वापरावीत” असा सल्लाही रोहित पवार यांनी महायुती सरकारला दिला आहे.