
मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी काही वेळातच सुरू होणार असतानाही अद्याप मतदानाची अधिकृत टक्केवारी जाहीर करण्यात आलेली नसल्याने वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, निवडणूक आयोगाचा असा कारभार यापूर्वी कधीच पाहायला मिळालेला नाही. महापालिकांमध्ये महापौर कोणाचा बसवायचा, याचे राजकीय गणित शेवटच्या क्षणी जुळवण्यासाठीच मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यास टाळाटाळ केली जात आहे का, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
मतदानाची टक्केवारी जाहीर करायची की नाही, हा निर्णय आयोगाने घ्यावा, मात्र किमान आपण भाजपाची ‘बी-टीम’ असल्याचे तरी जाहीर करावे, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली आहे.
काही वेळातच मतमोजणीला सुरवात होईल, तरीही निवडणूक आयोगाने मुंबईसह अनेक महापालिकांच्या मतदानाची अधिकृत टक्केवारी अद्यापही जाहीर केलेली नाही.. निवडणूक आयोगाचा हा असा कारभार पहिल्यांदाच बघायला मिळत असून कदाचित महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच तर ही टक्केवारी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 16, 2026





























































