
कसोटी आणि टी-20 क्रिकेटच्या निवृत्तीनंतर केवळ वन डेत खेळण्याचे ध्येय बाळगून सध्या विश्रांती घेत असलेल्या रोहित शर्माची वेगाने बदलत चाललेल्या मैदानातील परिस्थितीमुळे धाकधूक वाढलीय. 2027 सालच्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहत असलेल्या रोहितला सध्या संघातील आपली सलामी टिकवण्यासाठी हिंदुस्थान ‘अ’ संघाचा आधार घेत पुनरागमन करावे लागण्याची शक्यता आहे.
यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान संघ शेवटचा खेळला होता. या स्पर्धेत हिंदुस्थानने बाजीही मारली, मात्र त्यानंतर गेले सहा महिने रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. येत्या 19 ऑक्टोबरपासून हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्माकडेच नेतृत्व कायम ठेवणार की गिलकडे सोपवणार, हे आशिया कपच्या निकालानंतरच कळेल. पण सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर थेट मैदानात उतरणे रोहितला कठीण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये हिंदुस्थान ‘अ’च्या तीन अनधिकृत वन डे सामन्यांच्या मालिकेद्वारे क्रिकेटमध्ये परतण्याचे तो सध्या प्लॅनिंग करतोय.
रोहितचे हिंदुस्थानच्या वन डे संघात कायम राहण्याचे स्वप्न असले तरी त्याच्या फिटनेस आणि फॉर्मवरच ते पूर्णतः अवलंबून आहे. सध्या रोहितसह विराटही ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर वन डेमधूनही निवृत्त होत असल्याची जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे. या अफवेची आग बीसीसीआयच्या गोटातूनच लावण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच सध्या धूर रोहित-विराटच्या डोळय़ांना त्रास देऊ लागला आहे. या दोघांना संघात पुनरागमन करणे सध्या तरी सोप्पे असले तरी ते टिकवणे मात्र कठीण झाले आहे. रोहित-विराटच्या उपस्थितीत यशस्वी जैसवाल, शुभमन गिल, के. एल. राहुल यांना आपल्या फलंदाजीच्या क्रमात बदल करून खेळवावे लागणार. त्यामुळे हा बदल किती दिवस राहतो, हे येणारा काळच सांगू शकतो.
कर्णधार म्हणून हिशेब संपला?
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा क्रिकेटमधून गायब झाला. आता तो पुनरागमानाची वाट पाहतोय. पण याचदरम्यान शुभमन गिल हे नवे नेतृत्व हिंदुस्थानी क्रिकेटच्या क्षितिजावर तळपू लागले आहे. वाढत्या वयाबरोबर रोहितचा फिटनेसही ढासळत चालला आहे हे आयपीएलमध्ये दिसलेच होते. त्यामुळे क्रिकेटच्या स्पर्धात्मक शर्यतीतून बाहेर पडलेला रोहित वर्ल्ड कपचे स्वप्न साकारण्यासाठी आणखी किती धावतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.