रोखठोक – भारतात आणि अमेरिकेत बिघडलेली पॉलिटिकल सिस्टम

अमेरिका आणि भारतातील राजकीय व्यवस्था पूर्ण बिघडली आहे. अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी राजकारण सोडले. त्यांना उबग आलाय. प्रे. ट्रम्प यांच्या राजकारणापुढे हात टेकले. भारतातील माजी उपराष्ट्रपती धनखड हे काही दिवसांपासून ‘गायब’ आहेत. त्यांचे काय झाले?

जगभरातील राजकीय वातावरण निराशाजनक आहे. तरीही अधूनमधून सुखावणाऱ्या बातम्या येत असतात. पाच तारखेला सकाळी 11 वाजता राज्यसभा सुरू झाली तेव्हा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि उपसभापती हरिवंश सिंग यांच्यात खडाजंगी झाली. संसदेची बाह्य सुरक्षा मोदी काळात लष्करसदृश सुरक्षा दलांना दिली. लोकशाहीच्या मंदिरात सैन्य असे हे वातावरण, पण आता संसदेच्या ‘लॉबी’ परिसरात आणि प्रत्यक्ष सभागृहातील जागेतदेखील ‘सीआयएसएफ’चे जवान घुसवले. हे चित्र भारतीय लोकशाहीसाठी हानिकारक आहे. विरोधक लोकशाही मार्गाने सभागृहात निषेध करतात. प्रसंगी सभापतींसमोर येतात. क्वचितप्रसंगी सभागृहाच्या आसनासमोर ‘वेल’मध्ये येतात. या विरोधकांना रोखण्यासाठी संसदेचे स्वतःचे ‘मार्शल’ होते. संसदेची स्वतःची सुरक्षा व्यवस्था होती. एखाद्या सदस्याने जास्तच गडबड केली तर हे संसदेचे ‘मार्शल’ या सदस्यांना सरळ उचलून बाहेर नेत. आता या मार्शलची जागा ‘सीआयएसएफ’ म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सशस्त्र जवानांनी घेतली. यावर विरोधी पक्षनेते खरगे यांनी विचारले, “ही सिस्टम का बदलली? आम्ही खासदार म्हणजे दहशतवादी आहोत काय?” खरगे यांचे हे विधान योग्य आहे. मोदी व त्यांच्या सरकारला स्वतःच्या सावलीची भीती वाटते व त्यासाठी त्यांनी सर्व सिस्टम बदलली. राजकारणाचा उबग यावा व सर्व सोडून हिमालयात जावे असे वातावरण देशात आहे. या पार्श्वभूमीवर एक आशादायी बातमी अमेरिकेतून आली. अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी याच दिवशी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. (6 आागस्ट) हा योगायोगच आहे. कमला म्हणाल्या, “मला सध्याच्या राजकारणाचा उबग आलाय. यापुढे कोणत्याही राष्ट्रीय पदासाठी निवडणूक लढणार नाही.” त्यात कॅलिफोर्नियाच्या ‘गव्हर्नर’ पदाचाही समावेश आहे. श्रीमती हॅरिस पुढे जे सांगतात ते महत्त्वाचे. “अमेरिकेतील पॉलिटिकल सिस्टम उद्ध्वस्त झाली आहे आणि मी स्वतः लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी लढण्याइतकी मजबूत राहिलेली नाही याची खंत आहे.” कमला हॅरिस यांना जे वाटते तसे आपल्या देशातील किती राजकारण्यांना वाटते? भारतातील ‘पॉलिटिकल सिस्टम’देखील आज पूर्णपणे घसरणीला लागली आहे व मोदी यांच्या काळात ती सुधारण्याची शक्यता नाही, म्हणून कोणी राजीनामा देणार नाही.

धनखडांचे काय झाले?

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. उपराष्ट्रपती धनखड यांनी 21 जुलै रोजी संसदेच्या पहिल्या दिवशी राजीनामा दिला व तेव्हापासून जगदीप धनखड यांचा कोणाशी संपर्क आणि संवाद नाही. धनखड राजीनामा दिल्याच्या दिवसापासून गायब आहेत. संसदेतील अनेक खासदारांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण धनखड हे जणू अदृश्य झाले. देशाच्या माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा खासदारांना व राजकीय कार्यकर्त्यांना नाही, ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. धनखड यांना त्यांच्या राहत्या घरी ‘बंदी’ बनवून ठेवले. ते हाऊस अरेस्ट आहेत. त्यांच्या नातेवाईकांशीही त्यांचा संपर्क होऊ देत नाहीत, असे दिल्लीतील राजकीय वर्तुळातून सांगितले व ते खरे वाटते. आपल्याला नको असलेले विरोधक गायब करण्याची, तुरुंगात डांबण्याची, त्यांचा काटा काढण्याची पद्धत चीन व रशियासारख्या कम्युनिस्ट देशांत आहे. भगवेकरण सुरू असलेल्या भारतात ही पद्धत आता सुरू झाली असेल तर राहुल गांधींसह इतर सगळय़ांनीच सावध राहायला हवे. लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या भाजपच्या भीष्म पितामहालाही अशाच पद्धतीने गप्प केले गेले. आता राजीनामा दिलेले उपराष्ट्रपती धनखड गायब झाले. भारताची राजकीय व्यवस्था बिघडली आहे.

भाजपचे गुरू

भारतीय जनता पक्षाने देशभरात बरेच गुरू केले. त्यातले एक रामरहीम बाबा. रामरहीमच्या हरयाणातील आश्रमात सशस्त्र पोलीस दल पाठवून त्याला अटक केली. रामरहीम बाबाला 2017 साली सीबीआय कोर्टाने आश्रमातील दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. पण हे रामरहीम पंजाब, हरयाणा, दिल्लीत कोणत्याही निवडणुका असल्या की, भाजपकृपेने हमखास तुरुंगातून ‘पॅरोल’वर बाहेर येतात व आश्रमात बैठका घेऊन भाजपला मतदान करावे असे फर्मान त्यांच्या शिष्यांना देतात. ही भाजपची स्वतंत्र पॉलिटिकल सिस्टम आहे. आता पुन्हा रामरहीम साहेबांचा वाढदिवस असल्याने सरकारने पुन्हा ‘दयाबुद्धी’ने वाढदिवस साजरा करण्यासाठी ‘पॅरोल’वर सोडले. कायद्याचे, न्यायव्यवस्थेचे हे अधःपतन आहे. रामरहीम वाढदिवस साजरा करायला तुरुंगातून बाहेर येतो व देशाचे माजी उपराष्ट्रपती धनखड काही दिवसांपासून गायब आहेत. धनखडनंतर राज्यसभेच्या सभागृहात केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान उभे केले गेले आणि त्यावर प्रश्न विचारला तेव्हा उपसभापती साहेबांनी एक तास लोकशाहीवर प्रवचन झोडले. अमेरिकेचे प्रे. ट्रम्प अशीच प्रवचने झोडत आहेत. त्यास कंटाळून कमला हॅरिस यांनी राजकारण सोडले. आपल्याकडे सगळाच आनंद आहे.

मोदींचे स्वदेशी

अमेरिकेचे अध्यक्ष प्रे. ट्रम्प यांनी आतापर्यंत 34 वेळा सांगितले की, भारत-पाक युद्ध आपण थांबवले. यावर आपले लाडके पंतप्रधान मोदी यांनी कोणताही प्रतिवाद केला नाही. त्यांच्या मौनातच युद्धबंदीचे रहस्य दडले आहे. मोदी हे भाजपच्या खासदारांसमोर आक्रमकपणे बोलतात. विरोधकांना शहाणपण शिकवतात, पण प्रे. ट्रम्प यांच्या भारतविरोधी वक्तव्यांपुढे ते नांगी टाकतात. प्रे. ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावले व दंडही आकारला. तरीही मोदी बोलायला तयार नाहीत. “भारतीय लोकांनी आता परदेशी माल वापरू नये. स्वदेशी वस्तू घ्याव्यात” हे त्यांचे ‘टॅरिफ’वरचे उत्तर, पण स्वतः मोदी स्वदेशीचे किती अनुकरण करतात? भाजप नेत्यांची मुले परदेशात शिकतात. पुन्हा या सगळ्यांचा काळा पैसा विदेशी बँकेत. स्वदेशीची बात करणारे मोदी स्वतः जर्मन बनावटीची बीएमडब्ल्यू कार वापरतात. इटालियन बनावटीचा Giorgio Armani सूट वापरतात. केनेथ कोल (Kenneth Cole) या अमेरिकन कंपनीचे बूट वापरतात. रॉजर डुबुआ (Roger Dubuis) या इटालियन कंपनीचे घड्याळ, cooper vision (America) चा चष्मा आणि अमेरिकेचा आयफोन वापरतात. मुख्य म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी ते अमेरिकेत जातात व जनतेला ट्रम्प यांना विरोध म्हणून स्वदेशी माल घ्यावा असे सांगतात, हा विनोद आहे.

कमला हॅरिस यांना अमेरिकेतील सध्याच्या राजकारणाचा उबग आला व त्यांनी तसे स्पष्ट बोलून दाखवले. भारतात ‘उबग’ यावा अशा घटना रोज घडत आहेत. महाराष्ट्रात भाजपच्या प्रवक्त्या आरती साठे यांची थेट मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केली गेली. भाजपने 2 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांच्या प्रवक्त्यांची एक यादी जाहीर केली. त्यात 21 व्या क्रमांकावर आरती साठे यांचे नाव आहे व आता त्या मुंबई हायकोर्टाच्या ‘मायलॉर्ड’ बनल्या. कुणालाच याचा उबग आला नाही. हे नक्की काय सुरू आहे? उद्या मोदींचा भाजप सत्तेवरून गेला तरी देशाच्या न्यायव्यवस्थेवर त्यांचा ताबा राहील. मुंबई हायकोर्टातले किमान सहा न्यायमूर्ती आरती साठेंप्रमाणे थेट भाजपशी संबंधित आहेत व आपला न्यायवृंद अशा नेमणुकांना परवानगी देतो. कारण सगळय़ांचेच हात दगडाखाली अडकले. येथे धर्मराज कोणी उरले नाही. त्यामुळे सत्याच्या दिशेने जाणारा रथ चिखलात अडकून पडतो. अमेरिकेची व भारताची स्थिती सारखीच. तिकडे ट्रम्प हे मोदींसारखे वागतात व इथे मोदी ट्रम्प यांच्यासारखे वागतात. सगळीच व्यवस्था बिघडली. कमला हॅरिस काय करणार? त्या चूपचाप निघून गेल्या.

Twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]