
क्रीडा क्षेत्रात समानतेचा आवाज आता अधिक बुलंद होत असून कॅरमच्या बोर्डावरही समतेची निर्णायक स्ट्राईक बसली आहे. ग्रॅण्डस्लॅम आणि आंतरराष्ट्रीय टेनिसप्रमाणेच पुरुषांइतकीच बक्षीस रक्कम महिलांना देण्याचा धाडसी आणि प्रेरणादायी निर्णय रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती (जुहू) यांनी घेतला आहे. त्यामुळे 3 ते 5 एप्रिलदरम्यान पार्ल्याच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात खेळल्या जाणाऱया राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत ‘क्वीन’लाही ‘किंग’इतकाच सन्मान मिळणार आहे.
पुरुषांइतकेच कॅरमपटू महिलांच्या गटातही निर्माण व्हावेत आणि जास्तीत जास्त महिलांचाही कॅरम खेळात सहभाग व्हावा म्हणून रोटरी क्लब आणि स्मारक समिती गेली सहा वर्षे हा समानतेचा निर्णय कटाक्षाने पाळत असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक प्रशांत देवरुखकर यांनी दिली. दोन्ही गटांना समान दर्जाचा सन्मान देण्यात येत असल्याचे सर्वच कॅरमप्रेमींनी काwतुक केले आहे.
पुरुष गटात विजेत्यांची संख्या वाढवावा
स्पर्धेत दोन्ही गटांना समान पुरस्कार दिला जात आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र पुरुष गटात 426 तर महिला गटात फक्त 46 खेळाडू सहभागी झाल्या आहेत. या दोन्ही गटांतील विजेत्यांना रोख 25 हजार रुपये दिले जाणार असून पुरुष गटात अव्वल दहा खेळाडूंना 70,500 रुपये मिळतील. पण महिलांना इतकीच रक्कम 46 पैकी पहिल्या 10 खेळाडूंना दिली जाणार आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांचा आकडा नऊपट आहे. त्यामुळे पुरुषांच्या विजेत्यांचा आकडा दहाऐवजी 20 केला तर या गटातील विजेत्यांनाही थोडासा दिलासा मिळेल, अशी भावना स्पर्धेत सहभागी कॅरमपटूंनी बोलून दाखवली.
प्रशांत, समृद्धीला अग्रमानांकन
या स्पर्धेला राज्यातील तब्बल 472 कॅरमपटूंचा कस लागणार आहे. राज्याच्या अनेक जिह्यांतील एकापेक्षा एक खेळाडू सहभागी झाल्यामुळे स्पर्धा चुरशीचा होणार, असा विश्वास महाराष्ट्र कॅरम संघटनेचे सचिव अरुण केदार यांनी व्यक्त केला. स्पर्धेत पुरुष गटात मुंबईच्या प्रशांत मोरेला तर महिला गटात समृद्धी घाडीगावकरला प्रथम मानांकन देण्यात आले आहे.



























































