विल्सन जिमखान्यासाठी आज मोर्चा, मुंबईतील क्रीडांगणे परप्रांतीयांच्या घशात; ‘आम्ही गिरगावकर’च्या नेतृत्वाखाली धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील क्रीडांगणे परप्रांतीयांच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू आहे. मरिन ड्राईव्हच्या विल्सन जिमखान्याचा वाद मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच ती जागा महसूल अधिकाऱयांनी जैन संस्थेला दिली आहे. त्याविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला असून विल्सन जिमखान्याची जागा परत मिळवण्यासाठी उद्या ‘आम्ही गिरगावकर’ या संस्थेच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात विराट मोर्चा काढला जाणार आहे.

विल्सन जिमखान्याच्या मैदानावर विल्सन महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच गिरगावातील तरुणवर्ग खेळण्यासाठी जात होता. भुलेश्वर महसूल विभागातील भूमी अभिलेख कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक प्रदीप तावरे आणि भूमापक किशोर ढोकळे या अधिकाऱ्यांनी जिमखान्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही जिमखान्याची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या संस्थेच्या ताब्यात दिली.

‘अरे कोण बोलतोय, देणार नाय..! ’ आता, ‘विल्सन जिमखाना’ परत घेतल्याशिवाय राहणार नाय..!!’ अशी हाक ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने दिली आहे. उद्या दुपारी 1 वाजता आझाद मैदानावर मोर्चा काढला जाणार आहे. त्या मोर्चात गिरगावकरांसह मुंबईकर नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

  • जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने जिमखाना ताब्यात मिळताच तिथे मोठी हार्ंडग्ज लावून इव्हेंट सुरू करण्यात आले आहेत. जिमखान्याच्या मैदानावर स्थानिक मुलांना खेळण्यासाठी मज्जाव केला जात आहे, असा आरोप ‘आम्ही गिरगावकर’ या संस्थेने केला आहे. कोणत्या अधिकारात हा जिमखाना जैन संस्थेला दिला गेला, असा सवाल संस्थेने केला आहे.