Bhandara news – स्टेशन आल्याचं कळलं नाही, प्रवाशानं उडी घेतली; आरपीएफ महिला जवानानं वाचवला जीव!

चालत्या ट्रेनमधून बाहेर डोकावू नका, उडी घेऊ नका…‘गाडी के पायदान’ आणि फलाटामधील अंतरावर लक्ष द्या.. अशा प्रकारच्या उद्घोषणा रेल्वेमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर होत असतात. मात्र अनेकदा घाईगडबडीमध्ये प्रवासी याकडे दुर्लक्ष करतात आणि जीव जाईल अशी परिस्थिती निर्माण होती. असाच एक बाका प्रसंग हावडा येथून गोंदियाकडे येणाऱ्या प्रवाशासोबत घडला. मात्र रेल्वे स्थानावर दक्ष असणाऱ्या आरपीएफ महिला जवान आणि तिच्यासोबच्या जवानांमुळे त्याचा जीव वाचला. हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

गोंदिया रेल्वे स्थानकावर गाडी क्र. 22894 हावडा-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचे फ्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आगमन झाले आणि दोन वाजून 18 मिनिटांनी ही गाडी पुढे सुटली. मात्र आपले स्टेशन आल्याचे न कळल्याने कोन नंबर 5-बीमधून हावडा येथून गोंदिया स्थानकावर येणाऱ्या प्रवाशाने चालत्या रेल्वेतून उडी घेतली.

रेल्वेचा वेग आणि फलाटाचा अंदाज न आल्याने तो फ्लॅटफॉर्मवर जोरात आदळला. ट्रेनच्या चाकांखाली जाणार तेवढ्यात मात्र रेल्वे स्थानकावर दक्ष असणाऱ्या महिला आरपीएफ जवान जया ऊके आणि त्यांच्यासोबत असणारे प्रधान आरक्षक एम.के. वाघ व सहायक उपनिरीक्षक अजय चौबे यांनी प्रसंगावधान राखत सदर प्रवाशाला मागे ओढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

प्रदीप सिन्हा अरे प्रवाशाचे नाव असून तो सुखरूप आहे. गोंदिया स्थानकावर त्याला उतरायचे होते. मात्र स्थानक आल्याचे कळले नाही आणि गाडीने वेग घेतल्यानंतर लक्षात आल्याने त्याने बाहेर उडी घेतली होती. मात्र आरपीएफ महिला जवानामुळे त्याचा जीव वाचवा. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून दक्ष आरपीएफ महिला जवानावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.