
सध्या देशात लोकशाहीची स्थिती विदारक झाली आहे. निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला अपेक्षित असलेले उमेदवार निवडून न येता हेराफेरी करुन मतदान यंत्रात बदल करुन सत्ता स्थापन करण्यात आली. ही विदारक बाब असल्याचे सांगून सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहिणी योजनेचे पैसे लाचेच्या स्वरुपात मतदारांना देत मतदान करून घेतल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी केला आहे.
डॉ. यशपाल भिंगे व महेश देशमुख तरोडेकर यांनी आयोजित केलेल्या प.पू. स्वामी रामानंद तीर्थ स्मृती व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते. वानखेडे यांना भारतीय लोकशाहीचे भवितव्य हा व्याख्यानाचा विषय देण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले, भारतीय लोकशाहीचे भवितव्य पूर्णतः धोक्यात आले असून 2014 पासून देशात आलेले सरकार हे हुकूमशाही पध्दतीने जनतेची दिशाभूल करुन वेगवेगळी आश्वासने देत या देशातील लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील संविधान धोक्यात आले असून मागच्या काही काळात झालेल्या घटना, सत्ताधारी मंडळींची बेताल वक्तव्य, लोकसभेत जबाबदार मंत्र्यांची बेताल वक्तव्य लक्षात घेता या लोकशाहीचे अधःपतन होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
निवडणुकीतील मतदानाची वेळ संपल्यानंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकाचवेळी मतदानासाठी रांगा लागतात, हे मोठे आश्चर्य आहे. जवळपास आठ टक्के मतदान या वाढीव काळात वाढविण्यात आले. याबद्दल जागरुक मतदार कसा काय आवाज उठवत नाही, असा सवाल त्यांनी केला. गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत एका मिनिटात तीन मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला हे आश्चर्यकारक आहे. वास्तविक एका मतदाराला जवळपास चार मिनिटे लागत असताना हा चमत्कार गुजरातमध्ये घडला हे लोकांनी उघड्या डोळ्यांनी बघितले.
लाडक्या बहिण योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांतून तुम्ही मत विकल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. वेगवेगळ्या योजना निवडणुकीच्या काळात जाहीर करुन जनतेची फसवणूक करण्याचे काम राज्यातील सरकारकडून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या विरोधात बोलणार्यांची बोलती बंद केली जाते, त्यांच्याविरुध्द ईडी, सीबीआय, मनिलॉड्रींगच्या माध्यमातून भिती दाखवून अटक केली जात आहे. अनिल देशमुखसारख्या मंत्र्यावर चुकीचे आरोप करुन शंभर कोटीची वसुली केल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात दिड कोटीचाही आकडा समोर आला नाही. तेरा महिने ते जेलमध्ये होते. हे चित्र विदारक व दहशत पसरविण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. ईडी, सीबीआयसारख्या संस्थामार्फत विरोधकांना भिती दाखवून त्रस्त केले जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याला घाबरुनच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. चक्की पिसिंगच्या घोषणा करुन अजित पवारांविरुध्द आरोप करणारे आज मांडीला मांडी लावून बसले आहेत. आज त्याच चक्कीमधील पीठ आपण खात आहोत, असा आरोपही त्यांनी केला. भारतीय लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मतदारांनी जागरुकपणे योग्य उमेदवारालाच मतदान केले पाहिजे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला शहर आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.