
रशियाला आज जोरदार भूकंपाचे धक्के बसल्यानंतर विविध ठिकाणी त्सुनामीचे तांडव पाहायला मिळाले. या भूकंपाची रिश्टर स्केल तीव्रता 8.8 इतकी होती. भूकंपाच्या धक्क्यानंतर तात्काळ रशिया, जपान, अमेरिका सह अन्य काही देशांमध्ये त्सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला. भूकंपाच्या धक्क्यानंतर शहरातील किनाऱ्यालगतचे बंदरगाह, हॉटेल आणि विमानतळे तात्काळ बंद करण्यात आले. पोर्ट सॅन लुईस, वेंचुरा हार्बर, सांता मोनिका सारख्या भागात समुद्राच्या लाटा उसळल्या.
रशियाच्या कामचटका द्विपकल्पात बुधवारी सकाळी भल्या पहाटे 4 वाजून 85 मिनिटांनी हा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपामुळे परिसरात एकच पळापळ झाली. शेकडो लोक रस्त्यावर धावले. तर त्सुनामी आलेल्या भागात लोक घराच्या छतावर चढले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 19.3 किलोमीटर खोल होता. भूकंपानंतर कामचटकाच्या समुद्र किनारी भागात जवळपास 4 मीटर उंच त्सुनामीच्या लाटा उसळल्या. भूकंपाचा इमारती आणि घरांना तडाखा बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बालवाडी शाळेसह काही घरांचे छप्पर कोसळले. भूकंपाचा हादरा जाणवताच लोकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. भूकंपाच्या धक्क्यामुळे घरातील वस्तू खाली पडल्या. भूकंपामुळे कामचटकातील सेवेरो-पुरिलस्क शहरातील बंदराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रशियाच्या उत्तर किनाऱ्यावर झाडे कोसळली, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
चीनच्या हुवेईलाही इशारा
रशियातील सर्वात मोठा भूकंप आल्यानंतर जगभरातील 12 देशांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये जपान, अमेरिका, फिलिपिन्स, न्यूझिलंड आणि चीनच्या हुवेई सह अन्य काही देशांच्या समुद्र किनारी भागांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानच्या इवाते प्रांतात असलेल्या पुइजी पोर्टवर उंचच उंच लाटा उसळल्या. भूकंपामुळे जपानच्या फुकुशिमा अणुप्रकल्प संयंत्रला रिकामे करण्यात आले. अमेरिकेच्या अलास्का, कॅलिफोर्नियापर्यंत किनाऱ्यावर त्सुनामीच्या लाटा उसळल्या.
रिंग ऑफ फायर म्हणजे काय?
प्रशांत महासागरमध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्वालामुखी भूकंपाच्या केंद्राच्या जवळ आहे. त्याला जोडणाऱ्या रेषेला रिंग ऑफ फायर म्हटले जाते. हे 40 हजारांहून अधिक किलोमीटर दूर पसरले आहे. यामध्ये रशिया, अमेरिका, इंडोनेशिया, मेक्सिको, जपान, कॅनडा, ग्वाटेमाला, चिली, पेरू, फिलिपिन्स, गिनी, न्यूझिलंड, कोलंबिया, कोस्टा रिका, पनामा, निकारागुआ, पपुआ न्यू गिनी यासारख्या भागाचा समावेश आहे.