रशियाने युक्रेनला धुरात लोटले! तब्बल 143 ठिकाणी बॉम्बवर्षाव

जगातील आणखी एक युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चालवलेल्या प्रयत्नांना व्लादिमीर पुतीन यांनी पुरता सुरुंग लावला आहे. रशियाने युक्रेनमध्ये तब्बल 143 ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले असून तेथील जनतेला अक्षरशः धुरात लोटले आहे. या हल्ल्यांसह आगेकूच करत रशियाने युक्रेनच्या डोनेत्सक प्रांतातील दोन गावे ताब्यात घेतली आहेत.

रशिया-युक्रेनमध्ये मागच्या तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. रशियाचे अध्यक्ष पुतीन व युक्रेनचे अध्यक्ष व्लोदोमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चेची एक फेरीही त्यांनी पूर्ण केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी युक्रेनचे दोन प्रांत ताब्यात देण्याची अट पुतीन यांनी ठेवली आहे. तर, झेलेन्स्की यांनी ही अट फेटाळून लावली आहे. ट्रम्प हे झेलेन्स्की यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र दुसरीकडे रशियाने हल्ले सुरूच ठेवले आहेत.

युक्रेनचा पलटवार; अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला

युक्रेनने स्वातंत्र्यदिनीच रशियावर मोठा ड्रोन हल्ला केल्याचे समोर आले आहे. रशियातील कुर्स्क येथील सर्वात मोठय़ा अणुउर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले. रात्रीच्या वेळी अनेक उर्जा प्रकल्पांवर हल्ले चढवण्यात आले. हल्ल्यांदरम्यान कुर्स्क येथील प्रकल्पात भीषण आग लागली. यात जीवितहानी झाली नाही. रशियाचा लेनिनग्राड प्रदेशातील उस्ट-लुगा बंदरातही आग लागली. तेथे इंधन निर्यातीचे मोठे टर्मिनल आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत 95 युव्रेनियन ड्रोन पाडल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. तर रशियाने 72 ड्रोन आणि एक क्रुझ क्षेपणास्त्र डागले. त्यापैकी 48 ड्रोन पाडल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. दरम्यान, परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून ट्रम्प यांनी रशियाला इशारा दिला आहे. पुढच्या दोन आठवडय़ांत शांततापूर्ण तोडगा न निघाल्यास रशियावर आणखी आर्थिक निर्बंध लावले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

इस्रायलचा येमेनवर हल्ला क्षेपणास्त्र तळ उडवले!

साना: गाझापट्टीत धुमाकूळ घालणाऱ्या इस्रायलने आज येमेनची राजधानी सानाला लक्ष्य केले. येमेनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ व क्षेपणास्त्र तळांवर हवाई हल्ले करण्यात आले. ड्रोनच्या साहाय्याने केलेल्या या हल्ल्यामुळे शहरात अक्षरशः आगडोंब उसळला. यात काही लोक मारले गेले आहेत. ऑक्टोबर 2023 पासून इस्रायलने हमासविरोधात युद्ध पुकारले आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा देत इस्रायलवर हल्ले सुरू केले. त्यास प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने ही कारवाई केली. इस्रायली लष्कराने यास दुजोरा दिला आहे.

भविष्यातील युक्रेन सुरक्षित आणि मजबूत – झेलेन्स्की

युक्रेनने रविवारी 34 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.  यानिमित्ताने राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी कीव्हमधील इंडीपेन्डन्स स्क्वेअरवरून एक व्हिडीओ संदेश जारी केला. आम्ही एक असे युक्रेन बांधत आहोत जे सुरक्षित आणि मजबूत असेल. आमचे भविष्य फक्त आमच्या हातात आहे. संपुर्ण जग आता युक्रेनला समान दर्जा देते, असे झेलेन्स्की यांनी व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.