
इटली आणि माल्टा दरम्यान भूमध्य समुद्रात एक रशियन तेल टँकर भरकटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांशिवाय हे भरकटत असून याबाबत सागरी अधिकाऱ्यांनी इशारा जारी केला आहे. या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात इंधन आणि वायू असल्याने याला पर्यावरणाचा ‘टाइम बॉम्ब’ म्हटले जात आहे. याचा कोणत्याही क्षणी पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
हेलिकॉप्टरमधून घेतलेल्या दृश्यात या जहाजाचा एक भाग काळा पडला असून एका बाजूला कललेला दिसत आहे. जहाजाच्या डाव्या बाजूला एक मोठे छिद्रही दिसत आहे. त्याच्या सभोवताली पाण्यात एक पातळ थर दिसत असून, त्यामुळे प्रदूषणाची चिंता वाढली आहे.
या जहाजाचे नाव ‘आर्क्टिक मेटागाझ’ असून, ते रशियाचे आहे. या जहाजात अंदाजे 900 मेट्रिक टन डिझेल इंधन आणि 60,000 मेट्रिक टनांहून अधिक एलएनजी (LNG) होते, असे इटालियन अधिकाऱ्यांनी सांगितले. हा टँकर रशियाच्या तथाकथित ‘शॅडो फ्लीट’चा भाग असू शकतो. युक्रेन-रशिया युद्धामुळे 2022 मध्ये अमेरिका आणि युरोपीय देशांनी लादलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांना न जुमानता, रशियाकडून तेल आणि वायूची गुप्तपणे वाहतूक करण्यासाठी या जहाजांचा वापर करण्यात येत होता. सुमारे 277 मीटर लांबीचे हे जहाज रशियाच्या आर्क्टिक बंदर मुरमान्स्क येथून इजिप्तच्या दिशेने निघाले होते. एका ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, 3 मार्च रोजी माल्टाच्या आग्नेयेला सुमारे 311 किलोमीटर अंतरावर भूमध्य समुद्राच्या आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात या जहाजावर ड्रोन हल्ला झाला.
जहाजावर सागरी आणि हवाई ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला, असा दावा रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. जहाजात 30 कर्मचारी होते. हल्ल्यानंतर जहाजाला आग लागल्याने कर्मचाऱ्यांना जहाज सोडावे लागले. या आगीत काही कर्मचारी भाजलेही. नंतर सर्वांना लाईफबोट्सद्वारे वाचवण्यात आले. लिबियन तटरक्षक दलाच्या मदतीने जहाज बेनगाझी येथे हलवण्यात आले. या मोहिमेत लिबियातील रशियन दूतावासानेही सहकार्य केले.
वाऱ्याची दिशा बदलल्यास जहाज इटलीच्या किनाऱ्याजवळ येऊ शकते, अशी चिंता इटालियन सरकारला वाटते. परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी इटलीमध्ये एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संरक्षण, परराष्ट्र, ऊर्जा, सागरी आणि नागरी संरक्षण मंत्री उपस्थित होते. पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.
बैठकीतील तज्ज्ञांनी या जहाजाला गॅसने भरलेला टाइम बॉम्ब असे संबोधून, ते कोणत्याही बंदरात आणणे असुरक्षित असेल असा इशारा दिला. यामुळे, सरकारने सध्यापुरते ते बंदरापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.




























































