
शतकवीर एडन मार्करम आणि कर्णधार टेम्बा बवुमाने तिसऱ्या विकेटसाठी 143 धावांची झुंजार भागी रचत दक्षिण आफ्रिकेला पहिल्यावहिल्या जगज्जेतेपदाच्या दिशेने नेले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीवर ऑस्ट्रेलियाकडून जगज्जेतेपद खेचून आणण्यासाठी त्यांना आता 69 धावांची गरज आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आफ्रिकेने 2 बाद 213 अशी दमदार मजल मारली असून मार्करम 102 तर बवुमा 65 धावांवर खेळत आहे. गेल्या तीन दिवसांच्या चढउतारांमुळे दक्षिण आफ्रिका जगज्जेता होतो की ऑस्ट्रेलिया जगज्जेतेपद राखण्यात यश मिळवतो, हे पाहणे थरारक ठरेल.
एडन मार्करमच्या संयमी आणि धीरोदात्त खेळीने आज सारे अंदाज चुकवले. ऑस्ट्रेलियाचे 282 धावांचे आव्हान त्यांच्यासाठी खूप अवघड ठरणार असेच अंदाज होते. त्यातच फलंदाजीत चमक दाखवल्यानंतर मिचेल स्टार्कने रायन रिकल्टनची विकेट काढत ऑस्ट्रेलियाला सनसनाटी यश मिळवून दिले. मात्र त्यानंतर पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या एडन मार्करमने वियान मुल्डरसह 61 धावांची भागी रचत सामना अजून बाकी असल्याचे ऑस्ट्रेलियाला संकेत दिले. मुल्डरला (27) बाद करत स्टार्कने कसोटीचा थरार वाढवला. मात्र त्यानंतर मार्करम आणि बवुमाने आधी अर्धशतकी, मग शतकी आणि 143 धावांची अभेद्य भागी रचत ऑस्ट्रेलियाच्या पोटात गोळा आणला आहे. या भागीमुळे आफ्रिकेचे मनोधैर्य उंचावले तर ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर पडली.
मिचेल स्टार्क आणि जॉश हेझलवूडने ऑस्ट्रेलियाची ताकद वाढवली
गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करम आणि रायन रिकल्टन या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद करणाऱ्या मिचेल स्टार्कने फलंदाजीतही आपला अनोखा स्पार्क दाखवला. रबाडा-एनगिडीने ऑस्ट्रेलियाची 7 बाद 73 अशी केविलवाणी अवस्था करत कसोटीवर अनपेक्षितपणे आपली पकड मजबूत केली होती. तेव्हा नवव्या क्रमांकावर आलेल्या मिचेल स्टार्कने आधी अॅलेक्स पॅरीच्या साथीने 61 धावांची महत्त्वपूर्ण भागी रचत ऑस्ट्रेलियाला संकटातून बाहेर काढले. गुरुवारच्या 8 बाद 144 वरून खेळ सुरू करताना दिवसाच्या तिसऱ्याच षटकात रबाडाने नॅथन लायनची विकेट काढली. मात्र त्यानंतर स्टार्क आणि हेझलवूड या शेवटच्या जोडीने संघषपूर्ण 59 धावांची भागी रचत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत पोहोचवले. या दोघांच्या बॅटीतून निघालेली प्रत्येक धाव ऑस्ट्रेलियासाठी स्फूर्तिदायक ठरत होती तर ही धाव आफ्रिकन स्वप्नांवर घाव करत होती. स्टार्कने आपल्या कारकीर्दीतील दहावे अर्धशतक साकारताना नाबाद 58 धावांची खेळी केली. दोघांनी अनपेक्षितपणे 200 धावांचा टप्पाही गाठून दिला.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया (प. डाव)ः सर्वबाद 212 द. आफ्रिका (प. डाव) ः सर्वबाद 138.ऑस्ट्रेलिया (दु. डाव)ः सर्वबाद 207 (मार्नस लाबुशेन 22, पॅरी 43, स्टार्क ना. 58, हेझलवूड 17; रबाडा 4/59, एनगिडी 3/38). द. आफ्रिका (दु. डाव) ः 2 बाद 213 (मार्करम खेळत आहे 102, मुल्डर 27, बवुमा खेळत आहे 65; स्टार्क 2/53).