
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात लोळवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यांच्या या विजयीरथाच्या वेगाचा इंग्लंडलाही चांगलाच तडाखा बसला आहे. 4 सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा अवघ्या 5 धावांनी पराभव केला आणि मालिका सुद्धा आपल्या खिशात घातली. जवळपास 27 वर्षांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला वनडे मालिकेत त्यांच्याच घरात चितपट केलं आहे.
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने विस्फोटक अंदाजात फलंदाजी करत 8 गड्यांच्या मोबदल्यात 330 धावांचा डोंगर इंग्लंड पुढे उभा केला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने सुद्धा कडवी झुंज देत सामना जिंकण्यासाठी आतोनात प्रयत्न केले. परंतु त्यांना 9 गड्यांच्या मोबदल्यात 325 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आलं आणि दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 5 धावांनी सामन्यासह मालिका सुद्धा जिंकली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रीट्जकेने सर्वांनाच प्रभावित केलं. त्याने 77 चेंडूंमध्ये 85 धावा चोपून काढल्या आणि पदार्पनानंतर सलग पाच सामन्यांमध्ये अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने नवज्योत सिंह सिद्धू यांचा विश्वविक्रम मोडित काढला आहे. नवज्योत सिंह सिद्धू यांनी 1987 मध्ये पदार्पण केल्यानंतर सलग 4 सामन्यांमध्ये 50 हून अधिक धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना ऐतिहासिक ठरला आहे. कारण त्यांना ही मालिका जिंकण्यासाठी 27 वर्षांची वाट पहावी लागली होती. त्यांनी यापूर्वी 1998 मध्ये इंग्लंडचा तीन सामन्यांच्या वनेड मालिकेत 2-1 असा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर त्यांना इंग्लंडमध्ये वनडे मालिका जिंकण्यात वारंवर अपयश येत होतं. अखेर टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांचा दुष्काळही संपुष्टात आणला.