सामना अग्रलेख – भाजपची सुंता!

उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रातील सर्वच निवडणुकांत भाजपने ‘एआयएमआयएम’ म्हणजे मियाँ ओवेसींची छुपी मदत वारंवार घेतली. मतांच्या फाळणीसाठी ओवेसी हे भाजपच्या कामास येतच असतात. आता झाडामागचा हा रोमान्स उघड्यावर आला. भाजपचा हा नवा सत्ता पॅटर्न आहे. महाराष्ट्रात ओवेसी येऊन ‘बांग’ देऊन गेले की समजायचे, भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाला स्वतःची विचारधारा नाही. त्यांचे हिंदुत्व वगैरे ढोंग आहे व सत्तेसाठी साधलेला स्वार्थ आहे. सत्तेची ऊब नसेल तर हे तडफडताना दिसतील. त्यामुळे त्यांना शेजेवर ओवेसीचा पक्षही चालतो. सत्तेसाठी भाजपने आधी बांग दिली. मग निकाह लावला. सुंताही केली, पण काझीने जरा जास्तच जोरात ‘आयते’ पढल्याने भाजपचे हे लफडे जगभरात पोहोचले. धन्य आहे या ढोंगी पक्षाची!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. शिवसेना काँग्रेसबरोबर गेल्याने त्यांचे हिंदुत्व कसे मवाळ झाले वगैरे भाषणे हे लोक ठोकत असतात. त्याच भाजपने महाराष्ट्रातील महानगरपालिकांत काही ठिकाणी काँग्रेसबरोबर, तर काही ठिकाणी ओवेसी मियाँच्या एआयएमआयएमबरोबर निकाह लावल्याचे उघड झाले. या लफड्याची बोंब गावात झाल्याने देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसबरोबर काडीमोड घ्यायला लावला, तर एआयएमआयएमबरोबर ‘तलाक तलाक तलाक’ घ्यायला लावला व भाजपला शुद्ध करून घेण्याचा प्रयत्न केला, पण इज्जत धुळीस मिळायची ती मिळालीच. ‘जो बुंदसे गयी वो हौदसे नहीं आती’, अशी अवस्था महाराष्ट्रातील भाजपची झाली. अकोटमध्ये भाजपने एआयएमआयएमबरोबर उघड निकाह लावला व त्यासाठी स्वतःची सुंता वगैरे करून घेतली. त्याच वेळी अंबरनाथ महापालिकेत शिंदे गटाची ठासण्यासाठी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली. हे सर्व लफडे आधी गुप्तपणेच चालले होते. त्यासाठी देवाणघेवाण, सौदेबाजी पूर्ण झाली, गळाभेटी झाल्या, पण कोणीतरी भाजपच्या शिरकुर्म्यात मिठाचा खडा टाकला. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांना खुलासा करताना नाकीनऊ आले व बुधवारी संध्याकाळी त्यांना जाहीर करावे लागले की, ‘‘अशा अभद्र युत्या सहन करणार नाही. ज्यांनी त्या केल्या त्यांच्यावर कारवाई करू.’’ आता हे काय कारवाई करणार? बरं, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः ठाणे जिह्यातलेच आहेत. त्यांच्या हाकेच्या अंतरावरील अंबरनाथ येथे झालेल्या या घडामोडी त्यांच्या अपरोक्ष झाल्या असे ते म्हणत असतील तर तो विनोदच आहे. तिकडे काँग्रेसने अंबरनाथमधील त्यांच्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. भाजपशी संगत चालणार नाही, असे त्यांना बजावून सांगितले. मात्र हे सर्व म्हणजे बाराच्या बारा नगरसेवक थेट भाजपवासी झाले. हे सगळेच भयंकर आहे. सध्या

भाजपचे ध्येयधोरण

सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर घसरणे हेच झाले आहे. मात्र त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण आव मात्र वेगळाच आणतात. अकोटचे भाजप आमदार भारसाखळे यांना बजावलेल्या नोटिसीत प्रांताध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, ‘‘ओवेसी यांच्या पक्षाशी युती करून भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांना तुम्ही सुरुंग लावला आहे.’’ चव्हाण यांचा दुसरा आक्षेप असा की, ‘‘हा निकाह लावत असताना तुम्ही कोणालाही विश्वासात घेतले नाही.’’ भाजपची नोटीस म्हणजे गंमत आहे. मुळात तुमची ध्येयधोरणे शिल्लक राहिली असतील तर त्यास सुरुंग लागेल! असंख्य गुंडापुंडांना, झुंडांना पक्षात घेताना, त्यांना निवडणुकीत उतरवताना व त्यांच्या प्रचारात जाताना या मंडळींना पक्षाची ध्येयधोरणे आठवली नाहीत. किंबहुना भाजपमध्ये गुंड-भ्रष्टाचाऱ्यांची भरती करून सत्ता मिळवणे हेच भाजपवाल्यांचे ध्येयधोरण बनले आहे का? अंबरनाथमध्ये भाजप काँग्रेसबरोबर गेली किंवा त्यांच्या सर्व निलंबित नगरसेवकांसाठी भाजप प्रवेशाच्या पायघड्या पसरल्या यात आश्चर्य वाटावे असे काय आहे? मोदींनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ हा नारा दिलाच होता, पण भाजपची अवस्था आता काँग्रेसयुक्त भाजप अशी झाली आहे. भाजपने काँग्रेस नेत्यांसाठी पायघड्या घातल्या व संपूर्ण काँगेस आपल्या पोटात जिरवली. काँग्रेसमधले सर्व भ्रष्ट पुढारी मोदी-शहांनी भाजपमध्ये घेतले. स्वतःला कर्तबगार पोरे होत नसल्याने दुसऱ्यांचे पाळणे हलवायचे व पोरे पळवायची हेच ध्येयधोरण भाजपने स्वीकारले आहे. हे असे असेल तर अंबरनाथमधील भाजपच्या राजकारणाकडे त्याच नजरेने पाहिले पाहिजे.

भाजपची काँग्रेस

झालीच आहे. त्यामुळे मुसलमानांविषयीदेखील भाजपचा दृष्टिकोन तितकाच ‘विधायक’ झाला असावा. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रातील सर्वच निवडणुकांत भाजपने ‘एआयएमआयएम’ म्हणजे मियाँ ओवेसींची छुपी मदत वारंवार घेतली. मतांच्या फाळणीसाठी ओवेसी हे भाजपच्या कामास येतच असतात. आता झाडामागचा हा रोमान्स उघड्यावर आला. भाजपचा हा नवा सत्ता पॅटर्न आहे. सत्तेसाठी काय वाटेल ते करू, पण काही झाले तरी विरोधी पक्षात बसणार नाही ही भाजपची मानसिकता बनली आहे. भाजपमधील 80 टक्के आमदार, खासदार, नगरसेवक वगैरे मंडळी काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेतून आयात केलेली आहेत व हे सर्व बाटगेच हिंदुत्वावरील त्यांच्या निष्ठांचे किळसवाणे प्रदर्शन करीत असतात. कालपर्यंत काँग्रेसच्या पखाल्या वाहणारे व हिंदुत्व, सावरकरांच्या नावाने शिव्या घालणारे एक भाजप मंत्री म्हणतात, ‘‘राजकारणाचा कंटाळा आला तर मी संघाचा प्रचारक म्हणून काम करीन.’’ म्हणजे भाजपचे काँग्रेसीकरण केल्यावर हे लोक संघाचीही काँग्रेस करणार! हे बरेच झाले. त्याचीच सुरुवात मुसलमानी पक्षाशी निकाह करून झालेली दिसते. महाराष्ट्रात ओवेसी येऊन ‘बांग’ देऊन गेले की समजायचे, भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाला स्वतःची विचारधारा नाही. त्यांचे हिंदुत्व वगैरे ढोंग आहे व सत्तेसाठी साधलेला स्वार्थ आहे. भाजपकडे स्वतःचे असे काहीच नसल्याने त्यांना इतर पक्षांतले नेते व युगपुरुष चोरावे लागतात. सत्तेची ऊब नसेल तर हे तडफडताना दिसतील. त्यामुळे त्यांना शेजेवर ओवेसीचा पक्षही चालतो. सत्तेसाठी भाजपने आधी बांग दिली. मग निकाह लावला. सुंताही केली, पण काझीने जरा जास्तच जोरात ‘आयते’ पढल्याने भाजपचे हे लफडे जगभरात पोहोचले. धन्य आहे या ढोंगी पक्षाची!