
ट्रम्प व मोदी यांच्यात काय बिनसले आहे की, त्यांनी भारताशी हा असा डाव मांडला आहे? प्रे. ट्रम्प यांना भाजपची मंडळी टरकते असेच लोकांना वाटते. भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी ट्रम्प यांच्या आगाऊपणाबद्दल त्यांच्या एक्स अकाऊंटवर मत व्यक्त करताच भाजपचे सर्वांग घामाने भिजले व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा यांनी खासदार राणावत यांना ती ‘पोस्ट’ रद्द करायला लावली. प्रे. ट्रम्प यांचे इतके भय भाजप व त्यांच्या नेत्यांना का वाटावे? ट्रम्प यांच्याकडे भाजप नेत्यांची व सत्ताधाऱ्यांची कोणती रहस्ये आहेत, ज्यामुळे ट्रम्प यांच्या बाबतीत आपण बोटचेपे धोरण स्वीकारले आहे. प्रे. ट्रम्प यांनी ‘अॅपल’सारख्या कंपन्यांना भारतातून बाहेर काढणे म्हणजे आमच्या पोटावर लाथ मारण्याचाच प्रकार नाही काय? ट्रम्प भारतावर का पिसाटले आहेत? जरा कळू द्या!
अमेरिकेशी भारताचे संबंध नेमके काय आहेत, याचा खुलासा निदान परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर यांनी करायला हवा. प्रे. ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदी यांनी पाकिस्तानबरोबरचे युद्ध थांबवले व हातातोंडाशी आलेल्या पाकव्याप्त कश्मीरवर पाणी सोडले. अमेरिकेशी व्यापार करायचा असेल तर पाकिस्तानबरोबरचे युद्ध थांबवा, अशी भूमिका प्रे. ट्रम्प यांनी घेतली व आपण ती मान्य केली. तरीही व्यापाराच्या मुद्द्यांवर ट्रम्प यांनी भारताला दिलेला शब्द मोडला आहे. अमेरिकेतील उद्योगपती भारतात गुंतवणूक करू इच्छितात. त्यांना ट्रम्प यांनी मागे खेचले आहे. भारतात गुंतवणूक करण्याची गरज नसल्याचे ट्रम्प यांनी उद्योगपतींना सांगितले. हा भारतावर आर्थिक बॉम्बहल्ला आहे. ‘अॅपल’ने आपल्या स्मार्ट पह्नचे भारतातील उत्पादन थांबवावे आणि ते अमेरिकेत सुरू करावे अशी सूचना ट्रम्प यांनी ‘अॅपल’कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली. ट्रम्प हे आखाती राष्ट्रांच्या दौऱ्यावर असताना त्यांनी या सूचना केल्या. ट्रम्प यांचे हे वागणे बरे नाही. मोदी हे त्यांचे ‘अरे-तुरे’वाले मित्र आहेत. ट्रम्प यांनी निवडणुकीत विजयी व्हावे म्हणून मोदी यांनी भव्य प्रचार सभा अहमदाबादेत व अमेरिकेत घेतल्या (तेव्हा ट्रम्प यांचा पराभव झाला) व आता तर ट्रम्प यांचे ऐपून मोदी यांनी पाकिस्तानबरोबर युद्धविराम केला. ट्रम्प यांच्यामुळे दोन देशांतील अणुयुद्ध टळले व शांतता नांदू लागली. त्यामुळे प्रे. ट्रम्प यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळण्याचा मार्ग पंतप्रधान मोदी यांनी मोकळा केला. हे इतके करूनही ट्रम्प यांनी भारतात येणारी परकीय गुंतवणूक रोखावी हे बरे नाही. ‘अॅपल’ ही भारतात सर्वाधिक
रोजगार निर्माण करणारी
कंपनी आहे. ‘अॅपल’मुळे देशभरात दोन लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. भारत व अमेरिकेदरम्यान 550 बिलियन डॉलर्सचा व्यापार आहे. अमेरिका भारताचा पहिल्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार असलेला देश आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करार साधारण 250 अब्ज डॉलर्सचा आहे, तर चीनसोबतचा व्यापार 120 अब्ज डॉलर्सचा आहे. हे लक्षात घेतले तर व्यापार बंद करण्याच्या धमकीमुळे युद्धबंदी का स्वीकारली, हे सहज लक्षात येईल. आयात-निर्यात वेगळे व ‘अॅपल’सारख्या कंपन्यांनी प्रत्यक्ष भारतात येऊन स्वतःची उत्पादने निर्माण करणे वेगळे. ‘अॅपल’सारख्या मोठ्या कंपन्या भारतात स्वतःची उत्पादने निर्माण करीत आहेत व ‘अॅपल’ने भारतातला गाशा गुंडाळून अमेरिकेला यावे अशी इच्छा प्रे. ट्रम्प यांनी व्यक्त केली. ‘अॅपल’कडून भारतात आयफोनची निर्मिती केली जाते. जगभरातील एकूण आयफोन उत्पादनापैकी 15 टक्के उत्पादन भारतात होते. मागच्या आर्थिक वर्षात ‘अॅपल’ने दीड लाख कोटी रुपयांची उलाढाल भारतात केली. अशा जास्तीत जास्त कंपन्या भारतात यायला हव्यात. महाराष्ट्राचे सरकार प्रत्येक वर्षी अमेरिकेत जाऊन तेथील गुंतवणूक यावी यासाठी दौरे करते व जत्रा भरवते. महाराष्ट्रात अमेरिकेतून किती गुंतवणूक येत आहे, याचे भलेमोठे आकडे जाहीर करते. प्रत्यक्षात महाराष्ट्रात काहीच येत नाही व मोठे आकडे कागदावरच राहतात. ‘अॅपल’चे तसे नाही. ‘अॅपल’ला भारताच्या लोकसंख्येने आणि बाजारपेठेने आकर्षित केले. भारताची 140 कोटी लोकसंख्या ही सगळ्यात मोठी जागतिक बाजारपेठ आहे. या लोकसंख्येचा व्यापारी फायदा करून घेण्यासाठीकंपन्या धडपडत असतात. प्रे. ट्रम्प यांनी उद्योग-व्यापाराबाबत
भारताची आर्थिक कोंडी
करायचे ठरवले असेल तर भारत त्यांच्याशी कसा सामना करणार? ट्रम्प यांची भाषा अरेरावीची आहे. भारतात उत्पादन करण्याची गरज नाही. त्यांचे ते बघून घेतील. त्यांचे हितसंबंध त्यांना सांभाळू द्या, असे प्रे. ट्रम्प यांनी उघडपणे बोलणे हे भारताविषयी त्यांच्या मनात चांगल्या भावना नसल्याचे लक्षण आहे. ट्रम्प व मोदी यांच्यात काय बिनसले आहे की, त्यांनी भारताशी हा असा डाव मांडला आहे? दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्या झाल्या प्रे. ट्रम्प यांनी शेकडो भारतीयांना घुसखोर ठरवून, त्यांना हातापायांत बेड्या घालून लष्करी विमानाने भारतात पाठवले. इतर देशांच्या घुसखोरांबाबत त्यांनी ही अमानुषता दाखवली नाही. भारताचे घुसखोर परत पाठवल्यावर त्यांनी ती मोहीम थांबवली. म्हणजे भारतीयांना अमेरिकेतून हाकलणे हाच त्यांचा हेतू होता व या घडामोडींवर भारताने साधा निषेधही व्यक्त केला नाही. प्रे. ट्रम्प यांना भाजपची मंडळी टरकते असेच लोकांना वाटते. भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी ट्रम्प यांच्या आगाऊपणाबद्दल त्यांच्या एक्स अकाऊंटवर मत व्यक्त करताच भाजपचे सर्वांग घामाने भिजले व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा यांनी खासदार राणावत यांना ती ‘पोस्ट’ रद्द करायला लावली. प्रे. ट्रम्प यांचे इतके भय भाजप व त्यांच्या नेत्यांना का वाटावे? ट्रम्प यांच्याकडे भाजप नेत्यांची व सत्ताधाऱ्यांची कोणती रहस्ये आहेत, ज्यामुळे ट्रम्प यांच्या बाबतीत आपण बोटचेपे धोरण स्वीकारले आहे. प्रे. ट्रम्प यांनी ‘अॅपल’सारख्या कंपन्यांना भारतातून बाहेर काढणे म्हणजे आमच्या पोटावर लाथ मारण्याचाच प्रकार नाही काय? ट्रम्प भारतावर का पिसाटले आहेत? जरा कळू द्या!