
साऱ्या जगात आपणच भांडणे लावायची आणि वैर व वैरी निर्माण करून असंख्य देशांना शस्त्रांस्त्रांचा पुरवठा करायचा हा अमेरिकेचा मूळ धंदा आहे. शिवाय हा देश ताब्यात घे, त्या देशावर हवाई हल्ले कर, हे अमेरिकेचे पारंपरिक उद्योग डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात तर अधिकच वाढले. तरीही ट्रम्प महाशयांना शांततेचा नोबेल पुरस्कार कुठल्याही परिस्थितीत हवा आहे व त्यासाठी त्यांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांना खुशाल धमकीपत्र लिहिले आहे. शांततेच्या प्रयत्नांची व बालिशपणाची ही हद्दच नव्हे काय? ‘नोबेल’च्या निवड समितीने आता बालिशपणासाठीच एखादा पुरस्कार सुरू करून ट्रम्प यांचा हा ‘हट्ट’ पुरवायला हवा!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एकूणच वर्तन पाहता त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी बसवल्याबद्दल अमेरिकन जनतेला आता नक्कीच पश्चात्ताप होत असेल. आपण जागतिक महासत्तेचे प्रमुख आहोत याचे भान विसरून प्रे. ट्रम्प ज्या आचरट पद्धतीने वागत आहेत त्यामुळे जगभरात अमेरिकेचे हसू होत आहे. आपल्या राष्ट्राध्यक्षाचा दिवसेंदिवस वाढत चाललेला पोरकटपणा पाहून अमेरिकेची प्रगल्भ लोकशाहीवादी जनता मनातल्या मनात तरी खजील होत असणारच. पे. ट्रम्प यांचा नवीन पोरकटपणा शांततेच्या नोबेल पुरस्कारावरून पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. ‘शेंडी तुटो वा पारंबी, पण मला नोबेल पुरस्कार मिळालाच पाहिजे’, असा दुराग्रह ट्रम्प महाशयांनी गेले काही महिने धरला आहे व आता तर त्यांनी कमालच केली. नोबेल पुरस्कार ज्या देशातून दिला जातो, त्या नॉर्वेचे पंतप्रधान जोनास स्टोएर यांना ट्रम्प यांनी चक्क धमकीपत्र पाठवले. ‘तुम्ही मला शांततेचा नोबेल पुरस्कार दिला नाही. त्यामुळे तुम्ही माझ्याकडून आता शांततेची अपेक्षा करू नका. शांतता ही बाब आता माझ्या प्राधान्यक्रमात राहिली नाही व शांतता प्रस्थापित करणे आता माझ्यासाठी बंधनकारकही राहिलेले नाही’ असा गर्भित इशारा म्हणण्यापेक्षा दमबाजी करणारे हे पत्र आहे. पे. ट्रम्प यांचे नॉर्वेच्या पंतप्रधानांना लिहिलेले हे पत्र म्हणजे पोरकटपणाचा कळस आहे. ज्युनियर केजी किंवा बालवाडीतील मुले खेळताना जशी भांडतात व एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही म्हणून ‘कट्टी’ धरतात, चॉकलेट दिले नाही म्हणून रुसून बसतात, तसाच हा प्रकार आहे.
‘नोबेल’ न मिळाल्यामुळे
फुगून बसलेले प्रे. ट्रम्प आपला रुसवा मांडताना पत्रात पुढे म्हणतात, ‘मी अलीकडच्या काळात जगातील आठ युद्धे रोखली. मात्र युद्ध थांबविण्याच्या माझ्या कामगिरीची दखल तुमच्या देशाने घेतली नाही. माझे शांततेसाठीचे हे प्रयत्न पाहूनही तुमच्या देशाने मला नोबेल शांतता पुरस्कार दिला नाही. त्यामुळे इथून पुढे मला शांततेविषयी विचार करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. यापुढे शांततेपेक्षा अमेरिकेसाठी काय योग्य आहे याचाच विचार मी करेन.’ डेन्मार्कच्या ताब्यात असलेल्या ग्रीनलॅण्डवर कब्जा करण्याचा मनोदयदेखील ट्रम्प यांनी या धमकीपत्रातून व्यक्त केला. जेमतेम 60 हजार लोकवस्ती असलेले आर्क्टिक क्षेत्रातील हे सुंदर बेट कुठल्याही परिस्थितीत अमेरिकेला हवे आहे. जगातील सर्वात मोठे बेट असलेल्या ग्रीनलॅण्डच्या 80 टक्के भूभागावर कायम बर्फाची चादर असते. हे स्वायत्त बेट ताब्यात घेण्यासाठी भविष्यात रशिया व चीनने प्रयत्न केला तर तुलनेने दुबळा असलेला डेन्मार्क त्याचा प्रतिकार करू शकणार नाही, असा ट्रम्प यांचा दावा आहे. तसे झाले तर रशिया व चीनसारखे शत्रू अमेरिकेच्या अगदी उंबरठय़ावर येऊन पोहोचतील या भयातून अमेरिकेला ग्रीनलॅण्डमध्ये आपले बस्तान बसवायचे आहे. ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रान्स वगैरे ‘नाटो’ देशांचा विरोध झुगारून ट्रम्प यांना ग्रीनलॅण्ड बळकवायचे आहे. एकीकडे शांततेच्या पुरस्कारासाठी दावेदार आहे म्हणून सांगायचे आणि दुसरीकडे इराण, ग्रीनलॅण्ड, क्युबा, कोलंबिया वगैरे देशांवर आक्रमण करून साम्राज्यवाद व विस्तारवादाची राक्षसी वृत्ती दाखवायची असा
भयंकर विरोधाभास
खुद्द प्रे. ट्रम्पच जगाला दाखवत असतात. मुळात लोकशाही, स्वातंत्र्य, समानता, शांतता यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्ती कधीही पुरस्काराच्या मागे धावत नाहीत, पण ट्रम्प महाशयांचा थाटच काही वेगळा आहे. ‘मला व्हेनेझुएला पाहिजे, मला ग्रीनलॅण्ड पाहिजे, मला इराणवरही ताबा पाहिजे आणि मला शांततेचा नोबेल पुरस्कारही पाहिजे’, अशी आचरट व अतर्क्य मागणी फक्त ट्रम्पच करू शकतात. वास्तविक, नोबेल हा शांततेचा पुरस्कार नॉर्वेचे सरकार देत नाही. आल्फ्रेड नोबेल या दिवंगत रसायनशास्त्रज्ञ उद्योगपतीने आपल्या मृत्युपत्रात नमूद केल्यानुसार दर सहा वर्षांनी बदलणारी निवड समिती शांतता, साहित्य आणि विज्ञान यासाठी नोबेल पुरस्कार विजेत्यांची निवड करते. त्यावर नॉर्वेच्या सरकारचे कुठलेही नियंत्रण नाही. नोबेलसाठी ‘बालहट्ट’ धरणाऱ्या ट्रम्प यांना नॉर्वेच्या पंतप्रधानांनी हे वारंवार सांगितले तरीही ट्रम्प यांनी असे धमकीपत्र लिहावे हे जागतिक महासत्तेची आब घालवणारे आहे. साऱ्या जगात आपणच भांडणे लावायची आणि वैर व वैरी निर्माण करून असंख्य देशांना शस्त्रांस्त्रांचा पुरवठा करायचा हा अमेरिकेचा मूळ धंदा आहे. शिवाय हा देश ताब्यात घे, त्या देशावर हवाई हल्ले कर, हे अमेरिकेचे पारंपरिक उद्योग डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात तर अधिकच वाढले. तरीही ट्रम्प महाशयांना शांततेचा नोबेल पुरस्कार कुठल्याही परिस्थितीत हवा आहे व त्यासाठी त्यांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांना खुशाल धमकीपत्र लिहिले आहे. शांततेच्या प्रयत्नांची व बालिशपणाची ही हद्दच नव्हे काय? ‘नोबेल’च्या निवड समितीने आता बालिशपणासाठीच एखादा पुरस्कार सुरू करून ट्रम्प यांचा हा ‘हट्ट’ पुरवायला हवा!






























































