सामना अग्रलेख – हे ढोंगी आम्हाला हिंदुत्व शिकवतात!

मोदी-शहांसारखे 56 इंच छातीचे हिंदुत्ववादी देशावर राज्य करीत असताना जगात सर्वत्र हिंदू मार खात आहे. नेपाळातले हिंदुत्व संपले, म्यानमारमध्ये हिंदूंवर हल्ले सुरू आहेत. कंबोडियात हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत. मोदी यांनी अयोध्येत धर्मध्वजा फडकवली तरी या धर्मध्वजेवर निरपराध्यांच्या रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत. त्यामुळे हिंदूंना जगभरात त्रास सहन करावा लागतोय. हिंदूंवरील अत्याचारांविरोधात ‘ब्र’ही न काढणारे स्वतःला हिंदुत्ववादी मानतात व हिंदुत्वासाठी लढणाऱ्यांची टवाळी करतात हे फक्त मोदी-फडणवीस यांच्यासारख्या ढोंगी हिंदुत्ववाद्यांनाच शोभा देते. हिंदूंच्या प्रेतावरचे लोणी खाणारे हे लोक कश्मीरातील हिंदू पंडितांना अद्याप न्याय देऊ शकलेले नाहीत आणि आले मोठे हिंदुत्वाची ध्वजा फडकवायला!

भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व आणि राष्ट्रभक्ती म्हणजे ढोंग आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘‘आम्ही हिंदुत्ववादी होतो. आजही आहोत, उद्याही राहू. केवळ मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाही.’’ फडणवीसांचे हे वक्तव्य म्हणजे निव्वळ दुतोंडेपणाचे टोक आहे. हिंदूंच्या जीवनातील ऐतिहासिक सुवर्णक्षण म्हणजे अयोध्येतील बाबरीचे पतन. हे पतन शिवसैनिकांसह अनेक हिंदुत्ववाद्यांनी केले तेव्हा भाजपला दरदरून घाम फुटला. ‘‘अरे बापरे, हे काय घडले? आता कसे व्हायचे?’’ असे त्यांचे चेहरे झाले व भाजपचे तत्कालीन उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांनी घाईघाईने निवेदन केले की, ‘‘बाबरी पाडण्याशी आमचा काडीमात्र संबंध नाही. ही एक दुर्दैवी घटना आहे. या कृत्याशी भाजपचा संबंध नाही. हे काम बहुधा शिवसेनेने केलेले आहे.’’ म्हणजे भाजपची तेव्हा हातभर फाटली होती व शिवसेना सोबतीला नसती तर या फाटण्याला कधी टाकेही घालता आले नसते. बाबरीनंतरच्या दंगलीत हिंदूंचे रक्षण मुंबई-महाराष्ट्रात फक्त शिवसेनेने केले. या संघर्षात असंख्य शिवसैनिकांचे बलिदान झाले, पण हिंदुत्वाच्या या महान लढाईत भाजपच्या अंगास साधे खरचटले नाही. स्वतःची कातडी वाचवून हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचे टाळ कुटणारे हे लोक आहेत. फडणवीस म्हणतात, ‘‘आम्ही संकुचित नाही. आमचा हिंदुत्ववाद हा केवळ पूजा पद्धतीवर आधारित नाही, तर तो भारतीय जीवन पद्धतीवर आधारित आहे.’’ फडणवीस हे जे सांगत आहेत तेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व श्री. उद्धव ठाकरे आधीपासूनच बोलत आहेत. शेंडी, जानव्याचे व घंटा बडवण्याचे हिंदुत्व आम्ही स्वीकारले नाही हे प्रबोधनकार ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळय़ांनी वारंवार सांगितले.

हिंदुत्व ही एक जीवन पद्धती

आणि संस्कृती आहे व त्या संस्कृतीत सगळ्यांना सामावून घेतले आहे. कोणी काय खावे, कोणते कपडे घालावेत यावर हिंदुत्वाचा कडवटपणा ठरत नाही, पण नवहिंदुत्ववाद्यांनी खाण्यापिण्यावरून इतर धर्मीयांचे बळी घेतले व देशात तणाव निर्माण केला हे सत्य नाही काय? भारतात मुसलमान व ख्रिश्चनांविरोधात तिरस्कार पसरवायचा आणि त्यातून हिंदूंच्या मनात भय, असुरक्षितता निर्माण करायची हेच त्यांचे हिंदुत्व. हिंदूंना नोकऱ्या नाहीत, पोटभर अन्न नाही. आजही 80 कोटी हिंदूंना मोदी सरकारने फेकलेल्या 10 किलो फुकट रेशनच्या तुकड्यांवर जगावे लागते. हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात मुलींवर बलात्कार होतात व आसाराम, रामरहीम आणि कुलदीप सेनगरसारखे बलात्कारी सोडले जातात आणि प्रखर देशभक्त सोनम वांगचूक तुरुंगात जातात. असे हिंदुत्व काय कामाचे? 26 हिंदूंना पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. भाजपच्या धुरंधरांना प्रे. ट्रम्प यांनी दम भरताच रणमैदानातून त्यांनी पळ काढला. अशा पळपुट्यांचे हिंदुत्व देशाला मान्य नाही. या हिंदुत्वाचे पोथीपुराण फडणवीसांनी घरात चालवावे. कालपर्यंत वीर सावरकरांची टवाळी करणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर भुंकणारे चिल्लेपिल्ले भाजपमध्ये घुसून हिंदुत्वाचे प्रचारक बनतात तेव्हा हिंदुत्वाचा टिळाही काळा पडला असेल. आज मोदी-फडणवीसांच्या राज्यात ‘हिंदू खतरे में’ आला आहे अशी बोंब स्वतः मोदी व त्यांचे अंधभक्त मारतात तेव्हा तुमच्यासारख्या हिंदुत्ववाद्यांनी सत्तेच्या खुर्च्या का उबवायच्या? स्वतःला हिंदू म्हणून मिरवायचे, हिंदुत्वाचा गजर करायचा, सत्ता

हिंदू धर्मांधांसाठी

राबवायची व निवडणुका आल्या की, हेच हिंदुत्व कसे धोक्यात आहे अशी तोंडाची डबडी वाजवायची. मोदी व त्यांच्या नकली हिंदुत्ववाद्यांचे राज्य भारतावर आल्यापासून भारतातलाच नव्हे, तर जगातला हिंदू संकटात सापडला आहे. बाजूच्या बांगलादेशात हिंदूंविरुद्ध हिंसाचार पेटला आहे. हिंदूंची घरे, देवळे, हिंदूंच्या इस्टेटी जाळल्या जात आहेत. हिंदूंना जाळले जात आहे. हिंदूंना गुलामाची वागणूक दिली जात आहे. ‘‘हिंदूंनो, तुम्हाला वाचवायला इकडे कोणी येणार नाही’’ असा इशारा देणारे फलक जागोजागी लावले गेले. भारतात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या कारवाईची ही प्रतिक्रिया आहे व हिंदूंवरील हल्ल्यास मोदी-शहांचे धोरण जबाबदार आहे. बांगलादेशात हिंदूंवर हिंसक हल्ले होत असताना भाजप व संघ परिवाराचे लोक दिल्लीतील बांगलादेशच्या हायकमिशनसमोर निदर्शने करतात हा षंढपणा आहे. मोदी-शहांसारखे 56 इंच छातीचे हिंदुत्ववादी देशावर राज्य करीत असताना जगात सर्वत्र हिंदू मार खात आहे. नेपाळातले हिंदुत्व संपले, म्यानमारमध्ये हिंदूंवर हल्ले सुरू आहेत. कंबोडियात हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत. थायलंडमध्येही हिंदूविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. मोदी यांनी अयोध्येत धर्मध्वजा फडकवली तरी या धर्मध्वजेवर निरपराध्यांच्या रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत. त्यामुळे हिंदूंना जगभरात त्रास सहन करावा लागतोय. हिंदूंवरील अत्याचारांविरोधात ‘ब्र’ही न काढणारे स्वतःला हिंदुत्ववादी मानतात व हिंदुत्वासाठी लढणाऱ्यांची टवाळी करतात हे फक्त मोदी-फडणवीस यांच्यासारख्या ढोंगी हिंदुत्ववाद्यांनाच शोभा देते. हिंदूंच्या प्रेतावरचे लोणी खाणारे हे लोक कश्मीरातील हिंदू पंडितांना अद्याप न्याय देऊ शकलेले नाहीत आणि आले मोठे हिंदुत्वाची ध्वजा फडकवायला!