सामना अग्रलेख – मोनालिसाचे लग्न!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोनालिसा भोसलेच्या लग्नाने ज्यांना दुःखाचे कंठ फुटले त्यांनी स्वधर्मातील महिलांचे अश्रूही समजून घेतले पाहिजेत. भावनांचा गुंता मानवी मन हे एक अजब रसायन आहे. भोवतालची सामाजिक परिस्थिती त्यास कारणीभूत आहे. पुण्यात खासदार मेधा कुलकर्णी यांनी मुसलमान कुटुंबात लग्न करून गेलेल्या मराठी तरुणीस पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचा सोहळा साजरा केला, पण ती तरुणीसुद्धा तिच्या मर्जीनेच लग्न करून त्या कुटुंबात गेली होती. मोनालिसाही अशीच गेली. तिने स्वतःचे सुख शोधले, पण सांस्कृतिक फौजदारांना ते धर्मसंकट वाटते. ज्या राजेमहाराजांनी राज्य टिकविण्यासाठी आपल्या मुली मोगलांना दिल्या, त्या राजेमहाराजांचे बहुतेक वंशज आज भाजपच्या छत्रछायेखाली आहेत. उंचे लोग उंची पसंद! मोनालिसा भोसलेचे मात्र जगणे हराम झाले. तूर्त इतकेच!

मोनालिसा भोसलेचे लग्न हे देशातील नवहिंदुत्ववाद्यांना मोठे आव्हान ठरले आहे. हे नवहिंदुत्ववादी कोण आहेत? नथुराम गोडसेच्या जन्मदिनी महात्मा गांधींवर गोळ्या चालवणारे, आम्हाला मुसलमानांची मते नकोत, मुसलमानांच्या दुकानांतून हिंदूंनी खरेदी करू नये असे आवाहन करणारे, असे जाहीरपणे सांगणारे, पण मतदानाच्या आदल्या रात्री मुसलमानी वस्त्यांत जाऊन सौदेबाजी करणारे, गोमांस घरात ठेवल्याच्या संशयावरून मुसलमानांचे झुंडबळी घेणारे लोक मोनालिसाच्या लग्नाने चिंताग्रस्त झाले आहेत. मोनालिसाच्या लग्नामुळे अनेक प्रश्न देशात निर्माण झाले. म्हणजे आखातात युद्धाचा भडका उडून भारतात एलपीजी सिलिंडरचा जो तुटवडा निर्माण झाला व सिलिंडरसाठी ज्या रांगा लागल्या, त्या जणू मोनालिसाच्या लग्नामुळेच. मोनालिसाने फरमान खानबरोबर लग्न केले नसते तर भारतापुढील सर्व प्रश्न चुटकीसरशी मिटवता आले असते. त्यामुळे मोनालिसाचे काय करायचे? हा गंभीर प्रश्न भाजप व तथाकथित हिंदुत्ववाद्यांपुढे थैमान घालत आहे. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात रुद्राक्षांच्या माळा विकणाऱ्या मोनालिसा नावाच्या तरुणीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. तिचे डोळे बोलके व आकर्षक होतेच, पण तिच्या बोलण्याने व मोहक हास्याने समाज माध्यमांवर अनेक जण घायाळ झाले. तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली. मोनालिसा मूळची मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील. तिचे आडनाव भोसले, भटक्या विमुक्त समाजातील. रुद्राक्ष व मण्यांच्या माळा विकण्यासाठी ती व तिचे कुटुंब देशभरातील तीर्थस्थळे, धार्मिक यात्रांत भटकंती करीत असतात. तोच त्यांचा उपजीविकेचा व्यवसाय आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकताना सोशल मीडियावर मोनालिसाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे देशभरात ती प्रचंड प्रसिद्ध झाली. त्यानंतर चित्रपटात काम करावे अशा ‘ऑफर्स’ मोनालिसाला आल्या. पुढे काय झाले ते तिलाच माहीत. कित्येक महिने मोनालिसाचे नाव समोर आले नाही व आता अचानक मोनालिसा आणि फरमान खानने केरळातील मंदिरात जाऊन हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न केल्याच्या बातमीने नवहिंदुत्ववाद्यांच्या जीवनात भूकंप झाला. आमच्या हातात

धर्मसंरक्षणाच्या काठ्या

णि तलवारी असताना मोनालिसाने फरमानशी लग्न केलेच कसे? हिंदू समाज व संस्कृती रक्षणाची ठेकेदारी त्यामुळे संकटात आली. मोनालिसा व फरमान खानचा विवाह हा ‘लव्ह जिहाद’ असल्याची बोंब या लोकांनी ठोकली. मोनालिसाला फरमानने फूस लावून पळवले असेही या लोकांचे म्हणणे आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक प्रौढ व सज्ञान व्यक्तीला आपल्या इच्छेप्रमाणे लग्न करण्याचा अधिकार दिला आहे. कायद्याने बालविवाह, नवऱ्याच्या मृत्यूनंतर सती जाणे यावर बंदी आहे, पण स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार आंतरधर्मीय, आंतरजातीय लग्नास बंदी नाही, पण ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी माणसांच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ सुरू केली आहे. मोनालिसा भोसलेने फरमानबरोबर लग्न केले. तिने धर्मांतर केले नाही हे महत्त्वाचे, पण हिंदी सिनेसृष्टीतील अनेक बडय़ा कलाकारांनी दुसरे-तिसरे लग्न करता यावे म्हणून थेट इस्लामचा स्वीकार केला व त्या सर्व कलाकारांना भाजपने खासदार, मंत्री केले. मग येथे तुमच्या ‘लव्ह जिहाद’ला मान्यता का? हिंदीतल्या अनेक ‘खान’ मंडळींनी हिंदू मुलींशी, नटय़ांशी लग्न करून संसार मांडले व मोडलेही, हे सगळे तारे-तारका मंडळ भाजपच्या मंचावर सहज फिरतात. पंतप्रधान मोदी त्या सगळ्यांचे लाड करतात, पण सामान्य घरात असे लग्न प्रकार झाले की, या लोकांतला ढोंगी हिंदुत्ववाद जागा होतो व मोनालिसासारख्यांचे लग्न त्यांच्यासाठी धर्मद्रोह, ‘लव्ह जिहाद’ ठरतो. मोनालिसा ही भटक्या-विमुक्त जातीत मोडते व त्यांचे कुटुंब हिंदू आहे. मोनालिसाने सांगितले, ‘‘फरमानबरोबर लग्न माझ्या मर्जीने होत आहे. आमचे एकमेकांवर प्रेम आहे. माझ्या वडिलांनी माझे लग्न आमच्याच भावकीत ठरवले व ते माझ्यावर लग्नासाठी जबरदस्ती करीत होते. ज्याच्याबरोबर लग्न ठरले तो माझा भाऊच लागत होता. त्याच्याशी लग्न करणे मला पटत नव्हते. मी या लग्नात सुखी राहिले नसते. फरमानला मीच लग्नाचा आग्रह केला, पण आता आमच्या जिवास धोका आहे म्हणून केरळात आश्रयाला आले.’’ मोनालिसाचे हे मनोगत बोलके आहे. मोनालिसा व तिचा पती फरमान हे आता लग्नबंधनात अडकले. मंदिरात त्यांनी वरमाला घातल्या. फरमानने तिच्या केसावर सिंदूर लावला. त्यांनी फेरे घेतले, पण

हिंदुत्ववादी नवशिक्यांचे

म्हणणे आहे, फरमानने आता धर्मांतर करावे. पुन्हा ‘मोनालिसाचे 35 तुकडे करून ते फ्रिजमध्ये मिळतील’ अशी अभद्र भाषा ‘साध्वी’ म्हणवून घेणाऱ्यांकडून वापरली गेली, ती योग्य नाही. याआधी हिंदू मुलींनी मुसलमान तरुणांबरोबर केलेली लग्ने टिकली नाहीत. या लग्नांची शोकांतिकाच झाली. या मुलींच्या हत्या झाल्या, पण हिंदू तरुणींना हिंदू नवऱ्याने खतम केल्याच्या दुर्घटनाही आपल्या समाजात राजरोस घडत आहेत. ही एक विकृती व अघोरी विचार आहे. हिंदू संस्कृतीवर हे आक्रमण आहे का? तर नक्कीच आहे, पण हे आक्रमण फक्त ‘लव्ह जिहाद’विरुद्ध कायदे करून किंवा संस्कृती रक्षकांच्या जंगली फौजा निर्माण करून थांबणार नाहीत. भाजपशासित राज्यांत आता धर्मांतरविरोधी कायदा आलाच आहे. महाराष्ट्रातही या कायद्याचा शिरकाव होत आहे हे चांगलेच आहे. ‘लव्ह जिहाद’सारख्या घटनांना आळा बसेल असे या कायदा समर्थकांचे म्हणणे असले तरी आपल्याच समाजात वाढत असलेल्या घटस्फोटांकडे, महिला अत्याचारांकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही. वाजतगाजत लग्न करून नंतर त्या नव्या नवरीचाच हुंडाबळी घेण्याचे व मुलींना न नांदवण्याचे प्रकारही ‘लव्ह जिहाद’सारखेच मानून त्यांच्यावर तेवढीच कठोर कारवाई व्हायला हवी. मोनालिसा भोसलेच्या लग्नाने ज्यांना दुःखाचे कंठ फुटले त्यांनी स्वधर्मातील महिलांचे अश्रूही समजून घेतले पाहिजेत. भावनांचा गुंता व मानवी मन हे एक अजब रसायन आहे. भोवतालची सामाजिक परिस्थिती त्यास कारणीभूत आहे. पुण्यात खासदार मेधा कुलकर्णी यांनी मुसलमान कुटुंबात लग्न करून गेलेल्या मराठी तरुणीस पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचा सोहळा साजरा केला, पण ती तरुणीसुद्धा तिच्या मर्जीनेच लग्न करून त्या कुटुंबात गेली होती. मोनालिसाही अशीच गेली. तिने स्वतःचे सुख शोधले, पण सांस्कृतिक फौजदारांना ते धर्मसंकट वाटते. या फौजदारांना मोनालिसाचे लग्न हे जागतिक युद्ध, महागाई, बेरोजगारी, भारताने स्वीकारलेली अमेरिकेची गुलामी यापेक्षा मोठे संकट वाटत आहे. ज्या राजे-महाराजांनी राज्य टिकविण्यासाठी आपल्या मुली मोगलांना दिल्या, त्या राजे-महाराजांचे बहुतेक वंशज आज भाजपच्या छत्रछायेखाली आहेत. उंचे लोग उंची पसंद! मोनालिसा भोसलेचे मात्र जगणे हराम झाले. तूर्त इतकेच!