सामना अग्रलेख – महापौरबाईंचा विचित्र अजेंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गौतमभाईंवर धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई महापालिकेने सवलतींची केलेली लयलूट हा शतकातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचारच आहे. महापौर या भ्रष्टाचारास बूचलावणार असतील तर त्यांनी भ्रष्टाचार मुक्तीच्या गप्पा जरूर माराव्यात. अन्यथा या भ्रष्टाचाराशी लढण्याचे कर्तव्य मजबूत अशा विरोधकांवर सोडून द्यावे. मुंबई पालिकेच्या सभागृहात शंभरच्या आसपास नगरसेवक विरोधी बाकावर आहेत याचे भान नव्या कारभाऱ्यांनी ठेवावे. मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच ही परंपरा यावेळी खंडित झाली, पण मुंबईतील मराठी अस्मितेच्या रक्षणाची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी निर्माण केलेल्या शिवसेनेवरच राहणार आहे. उपऱ्यांच्या जिवावर मुंबईवर ताबा मिळवणाऱ्यांना भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागेल.

मुंबईच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या रितू तावडे विराजमान झाल्या. मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. सौ. तावडे यांचे बरेचसे राजकीय जीवन हे काँगेस पक्षात गेले. काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी निवडणुकाही लढवल्या. काँग्रेसचे अच्छे दिन जाताच त्यांनी इतरांप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश केला व आता त्या मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्या. तब्बल 42 वर्षांनी मुंबईत भाजपचा महापौर झाला. भाजपला मुंबईचे महापौरपद मिळवायला साडेचार दशके का लागली? मुंबईकर जनतेने त्यांना महापालिकेच्या सत्तेपासून दूर का ठेवले? हा त्यांच्यासाठी चिंतनाचा विषय आहे व आताही मुंबईचे महापौरपद त्यांनी मिळवले ते काही सरळ मार्गाने नाही. मराठी माणसाच्या एकजुटीत फूट पाडून त्यांनी हे सर्व घडवले. महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या व या प्रत्येक ठिकाणी महापौर विराजमान झाले, पण मुंबईचे महापौरपद विशेष आहे. एक तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई मराठी माणसाची आहे. मुंबई महाराष्ट्रात ‘यावी’ यासाठी संयुक्त महाराष्ट्राचे घनघोर युद्ध झाले व त्या युद्धात 106 मराठी हुतात्मे कामी आले. मराठी हुतात्म्यांच्या रक्तसिंचनातून मुंबई महाराष्ट्रास मिळाली. मुंबईचे मराठीपण टिकावे, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी शिवसेनेने लढे दिले. त्यामुळे गेली कित्येक वर्षे मुंबईकर मराठी माणसाने, शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या इतर भाषिकांनी मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर विराजमान होईल अशा पद्धतीने प्रत्येक वेळी मतदान केले. कालच्या निवडणुकीत जैन, मारवाडी, गुजराती, उत्तर भारतीय बहुसंख्य असलेल्या भागात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले. त्यांचा आकडा थोडा जास्त आहे. याचा अर्थ मराठी मुंबईचा सामाजिक समतोल बिघडला आहे. मुंबईतल्या सर्व मराठी बालेकिल्ल्यांत शिवसेना विजयी झाली, पण तेथे

अपशकून व्हावा

यासाठी गद्दारनाथ शिंदे यांनी त्यांचे लोक उभे केले व पाडापाडीचे मराठीद्वेष्टे राजकारण केले. मराठी माणूसच मराठी माणसाविरुद्ध उभा करून देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा महापौर मुंबईवर लादला. पुन्हा या सोहळ्यासाठी फडणवीस-मिंधे महापालिकेत खास उपस्थित राहिले. भाजपचे नगरसेवक मोदींचा जयजयकार करीत होते व दुसऱ्या तोंडाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने काम करू अशी ढोंगी भाषा करत होते. मुंबई शहरावर भाजपचा महापौर येणे हे संकट आहे. महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. मराठी माणसाला दुःखात टाकणारा हा दिवस आहे. भाजपचा मुंबई महापालिकेतील विजय आणि त्यांचा महापौर मुंबई शहरात होणे हे मराठी माणसाच्या लढ्यावर आलेले अंधारी सावट आहे. याची कारणे स्पष्ट आहेत. भाजप हा व्यापारी आणि धनिकांचे हित पाहणारा पक्ष आहे. सध्या भाजपचे खरे सूत्रधार उद्योगपती गौतमभाई आहेत व या गौतमास मुंबईची इंच इंच जमीन गिळून ढेकर द्यायचा आहे. धारावी, मिठागरे, मदर्स डेअरीची हजारो एकर जमीन त्यांनी मोदी व भाजपकृपेने गिळंकृत केली आहे. त्याशिवाय मुंबईच्या आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचा भूखंड व ‘पवनहंस’चा एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीचा शेकडो एकरचा भूखंडदेखील भाजपच्या गौतमभाईंना गिळायचा आहे. म्हणूनच मुंबईत भाजपचा महापौर व्हावा यासाठी धरण फुटावे तसा पैसा खर्च केला गेला. शिवसेनेच्या हाती मुंबई महापालिकेच्या चाव्या आल्या असत्या तर गौतमभाई व त्यांच्या भाजप पक्षाला मुंबईची ही लूट करण्यापासून रोखलेच असते. त्यामुळे शिवसेनेचा शुद्ध मराठी महापौर मुंबईत नको हा कट त्यांनी रचला व अंमलात आणला. संयुक्त महाराष्ट्र लढय़ात मोरारजी देसाईंनी ज्या निर्घृण पद्धतीने मराठी माणसांवर गोळ्या चालवल्या

त्याच निर्घृण पद्धतीने

गौतमभाईंचा पक्ष मुंबईचे लचके तोडत आहे. म्हणूनच भाजपचा महापौर होणे हा मुंबई-महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. महापौर रितू तावडे यांची दोन विधाने गमतीची, तितकीच हास्यास्पद आहेत. महापौर म्हणतात, ‘‘महापौर पदावर बसल्यानंतर मुंबई खड्डेमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करू. 25 वर्षांपासून साचलेला भ्रष्टाचाराचा कचरा बाहेर फेकून मुंबईला सुरक्षित शहर करू.’’ महापौरबाईंचा इरादा चांगला आहे, पण हे सर्व करणे त्यांच्या हाती राहिलेले नाही. महापौर म्हणतात, मुंबई शहर महिलांसाठी सुरक्षित करू. याचा अर्थ फडणवीस यांचे गृहखाते या बाबतीत अपयशी ठरले आहे. बांगलादेशी व रोहिंगे मुसलमान हाकलण्याचा विषय त्यांच्या अजेंड्यावर आहे. हीसुद्धा गृहखात्याचीच दिवाळखोरी आहे. दुसरे म्हणजे ज्या बांगलादेशींना महापौरबाई हाकलायला निघाल्या आहेत त्या बांगलादेशींच्या मदतीसाठी मोदी सरकारने 60 कोटी रुपयांचे विशेष दान अर्थसंकल्पात मंजूर केले आहे. चार वर्षांपासून मुंबईची सूत्रे प्रशासकांच्या हाती होती व या काळात गुजरात लॉबीच्या ठेकेदारांनी मुंबई पालिकेचा खजिना लुटला आहे. न केलेल्या हजारो कोटींच्या कामांची बिले उकळली व त्यातला मोठा ‘कट’ नगरविकास खात्याकडे पोहोचवला. या भ्रष्टाचाराची पोलखोल महापौरांनी करायला हवी. गौतमभाईंवर धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई महापालिकेने सवलतींची केलेली लयलूट हा शतकातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचारच आहे. महापौर या भ्रष्टाचारास ‘बूच’ लावणार असतील तर त्यांनी भ्रष्टाचार मुक्तीच्या गप्पा जरूर माराव्यात. अन्यथा या भ्रष्टाचाराशी लढण्याचे कर्तव्य मजबूत अशा विरोधकांवर सोडून द्यावे. मुंबई पालिकेच्या सभागृहात ‘शंभर’च्या आसपास नगरसेवक विरोधी बाकावर आहेत याचे भान नव्या कारभाऱ्यांनी ठेवावे. मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच ही परंपरा यावेळी खंडित झाली, पण मुंबईतील मराठी अस्मितेच्या रक्षणाची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी निर्माण केलेल्या शिवसेनेवरच राहणार आहे. उपऱ्यांच्या जिवावर मुंबईवर ताबा मिळवणाऱ्यांना भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागेल.