सामना अग्रलेख – मोदी यांना अदानींचा मोह का?

‘वॉशिंग्टन पोस्ट’ने एलआयसी पैशांच्या घोटाळ्याबाबत जे सत्यकथन केले त्यातही अर्थ मंत्रालय, नीती आयोगाने वेगाने निर्णय घेतले व अदानी समूहाचा कोठेच खोळंबा होऊ दिला नाही, असे म्हटले आहे. यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश विचारतात, ‘‘अदानी भाजपचे नक्की कोण लागतात?’’ या नात्याबाबत एकदा पंतप्रधान मोदी यांनी खुलासा केलाच पाहिजे. निदान श्री. अमित शहा, जे. पी. नड्डा वगैरे प्रमुख नेत्यांनी या नात्यावर झोत टाकला पाहिजे. मोदी हे स्वतःला फकीर मानतात. एक ‘झोला’ हीच त्यांची संपत्ती आहे. ते स्वतःला देशाचे प्रधान सेवक मानतात. त्यांना कुटुंबाचे पाश नाहीत. त्यामुळे मोहमाया, लोभ या षड्रिपूंशी मोदींचा संबंध नाही. हिंदू धर्मात याला महत्त्व आहे. मग पंतप्रधान मोदी अदानींच्या मार्गाने इतकी संपत्ती का एकवटत आहेत? षड्रिपूंचे प्रकरण एलआयसीतील जनतेच्या पैशांपर्यंत पोहोचले म्हणून चिंता वाटते इतकेच!  

उद्योगपती गौतम अदानी हे पंतप्रधान मोदी यांचे खास मित्र आहेत. त्यामुळे मोदी यांच्या सरकारने संपूर्ण देश अदानी यांच्या पायाशी ठेवला आहे. मोदी हे पंतप्रधान असले तरी अदानी हे देशाचे खरे मालक बनले आहेत. त्यामुळे 30 कोटी आयुर्विमाधारकांचे 34 हजार कोटी रुपये एलआयसीने अदानी यांच्या मालकीच्या कंपन्यांत गुंतवण्याचा जुगार खेळला यात आश्चर्य ते काय एलआयसीवर दबाव आणून अदानींच्या कंपन्यांमध्ये 34 हजार कोटी गुंतवण्यास भाग पाडले गेले असे वृत्त अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या प्रतिष्ठत वृत्तपत्राने प्रसिद्ध केले. भारतातील ‘गोदी’ मीडिया याबाबत थंड पडला असताना परदेशी मीडियाने हा विषय मांडावा हे भारतीय मीडियासाठी लज्जास्पद आहे. अदानींच्या कंपन्या, त्यातील गुंतवणूक म्हणजे बुडबुडा आहे. तो केव्हाही फुटू शकतो. अशा बुडबुड्या कंपन्यांत जनतेच्या घामाचा पैसा गुंतवणे हे धोकादायक आहे, पण विद्यमान सरकार हे अदानींच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. जनतेच्या कमाईचे हित पाहण्यापेक्षा अदानींच्या कंपन्यांचे हित पाहणे यास हे सरकार प्राधान्य देत आहे. एलआयसीमधील गुंतवणूक ही प्रामुख्याने मध्यमवर्गीय, सर्वसामान्य लोकांची असते व त्या गुंतवणुकीचा बाजार उठला तर त्याची जबाबदारी केंद्र सरकार घेईल काय हे आता अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले पाहिजे. पंतप्रधान मोदी व अदानींचे नाते अति खासगी स्वरूपाचे आहे. त्या नात्यासाठी जनतेचे 34 हजार कोटी व संपूर्ण देश पणास लावणे योग्य नाही. एलआयसीचे 34 हजार कोटी मोदी सरकार अदानींच्या कंपन्यांत गुंतवणार म्हणजे अदानींना

देश विकण्याची प्रक्रिया

आता पूर्ण होत आली आहे असेच म्हणावे लागेल. कारण जनतेचा पैसाही या सरकारने अदानींच्या खिशात घातला. अदानी यांनी मिळवलेली संपत्ती ही सत्तेचा दुरुपयोग करून मिळवलेली संपत्ती आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा दुरुपयोग करून, प्रतिस्पर्धी कंपन्यांवर दबाव आणून त्यांना त्यांची संपत्ती अदानी समूहाला विकायला भाग पाडली. विमानतळ, बंदरे, महत्त्वपूर्ण सार्वजनिक उपक्रम, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प, धारावीसारखे घर बांधणी प्रकल्प, रस्ते बांधणी हे सर्व ‘अदानी’ या एकाच समूहाला मिळत आहे. पंतप्रधान ज्या परकीय देशांत दौऱ्यावर जातात, त्या प्रत्येक देशात अदानी यांची गुंतवणूक सुरू होते व त्या देशात मोदी यांच्या मध्यस्थीने अदानी यांना ‘ठेके’ मिळतात हा योगायोग नक्कीच नाही. आता अदानी यांना ही संपत्ती विकत घेता यावी यासाठी एलआयसीला अदानींकडे गुंतवणूक करण्यास भाग पाडले गेले. ही जनतेच्या पैशांची लूट आहे. अदानी समूहावर कर्जाचा भार वाढत असताना गुंतवणूकदारांचा विश्वास वाढावा यासाठीच अर्थ मंत्रालय, नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी एलआयसीचा पैसा अदानींच्या कंपन्यांत गुंतवला. एलआयसीने हे सर्व आरोप फेटाळले व आपण जे केले ते कायद्याच्या चौकटीत राहूनच केल्याचा खुलासा केला गेला तरी लोकांचा त्यावर विश्वास बसणे कठीण आहे. अदानी कंपन्यांनी आतापर्यंत अनेक

घोटाळे व गोलमाल

उद्योग केले, पण पंतप्रधान मोदींचा त्यांना पाठिंबा असल्यामुळे अदानींना जाब विचारण्याची हिंमत सेबी, ईडी, सीबीआय करू शकले नाहीत. पंतप्रधान मोदी व भाजप हे नाममात्र सत्ताधारी आहेत. देशाच्या सरकारचे खरे सूत्रधार अदानी आहेत. देशात अदानी म्हणतील तेच घडत असेल तर देशाच्या सर्व मंत्रालयांना, पार्लमेंटला आणि न्यायालयांना टाळे ठोकावे लागेल. अदानी यांना एखादी संपत्ती हवी असेल किंवा अदानी यांनी एखाद्या संपत्तीवर बोट ठेवले तर ती त्यांना मिळवून देण्यासाठी सरकारदरबारी ज्या वेगाने सूत्रे हलतात त्यापुढे धावपटू मिल्खा सिंग यांचा वेगही कमी पडेल. एकदम झटपट निर्णय होतात. असे निर्णय इतरांच्या बाबतीत का होऊ नयेत? ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने एलआयसी पैशांच्या घोटाळ्याबाबत जे सत्यकथन केले त्यातही अर्थ मंत्रालय, नीती आयोगाने वेगाने निर्णय घेतले व अदानी समूहाचा कोठेच खोळंबा होऊ दिला नाही, असे म्हटले आहे. यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश विचारतात, ‘‘अदानी भाजपचे नक्की कोण लागतात?’’ या नात्याबाबत एकदा पंतप्रधान मोदी यांनी खुलासा केलाच पाहिजे. निदान श्री. अमित शहा, जे. पी. नड्डा वगैरे प्रमुख नेत्यांनी या नात्यावर झोत टाकला पाहिजे. मोदी हे स्वतःला फकीर मानतात. एक ‘झोला’ हीच त्यांची संपत्ती आहे. ते स्वतःला देशाचे प्रधान सेवक मानतात. त्यांना कुटुंबाचे पाश नाहीत. त्यामुळे मोहमाया, लोभ या षड्रिपूंशी मोदींचा संबंध नाही. हिंदू धर्मात याला महत्त्व आहे. मग पंतप्रधान मोदी अदानींच्या मार्गाने इतकी संपत्ती का एकवटत आहेत? षड्रिपूंचे प्रकरण एलआयसीतील जनतेच्या पैशांपर्यंत पोहोचले म्हणून चिंता वाटते इतकेच!