
प्रख्यात वेदांत उद्योग समूहाने ‘अदानी’शी टक्कर घेण्याचे पहिले पाऊल उचलले. अनिल अग्रवाल यांनी भगवद्गीतेतील संदेश मान्य करून सत्य, धर्म, साहस या मार्गाने अन्यायाविरुद्ध पहिले पाऊल टाकले. सार्वजनिक संपत्तीचे वितरण एकाच माणसाच्या नावाने करणे हा ‘क्रोनी कॅपिटॅलिझम’ आहे. अनिल अग्रवाल यांनी त्याविरोधात सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. ईश्वराची इच्छा काय ते आता कळेल!
महाराष्ट्रात सध्या अराजकीय विषयांची धुळवड सुरू आहे. ज्यांनी सत्तेचा उपयोग समाजपरिवर्तनासाठी करायचा, त्यांनी समाज बिघडवण्याचे काम सध्या जोरात सुरू केले आहे. महाराष्ट्रात पुढची तीन वर्षे निवडणुका नाहीत, पण तीन वर्षांनंतरच्या निवडणुकांचे राजकारण आतापासून सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एक सुखावणारी बातमी समोर आली. अनिल अग्रवाल हे बडे उद्योगपती अदानी समूहाविरुद्ध न्यायालयात गेले आहेत. अदानींना आव्हान देणे म्हणजे थेट पंतप्रधान मोदी व अमित शहांना आव्हान देण्यासारखे आहे. अनिल अग्रवाल यांच्या प्रख्यात वेदांत समूहाच्या बाबतीत काय घडले ते समजून घेतले पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील जयपी (Jaypee) समूह दिवाळखोरीत गेला. बँकांची कर्जे मोठ्या प्रमाणात त्यांनी घेतली होती. सरकारने 5.5 लाख कोटींच्या ‘जयपी’ ग्रुपच्या मालमत्तेसाठी बोली मागवली.
वेदांत ग्रुपची बोली – 17,000 कोटी. अदानी ग्रुपची बोली 14,500 कोटी. या ‘बोली’त सरळ वेदांत ग्रुपची सरशी झाली. तरीही हा प्रकल्प NCLTच्या माध्यमातून अदानीकडे सोपविण्यात आला. वेदांत आता सरळ याविरोधात सुप्रीम कोर्टात पोहोचला. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की, NCLTमध्ये मतदानाचे अधिकार कोणाकडे आहेत? सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांकडे हे अधिकार आहेत. या बँकांवर सरकारचे नियंत्रण आहे. अशा संस्थांना वाकवून निकाल बदलले जातात. देशातील प्रत्येक सार्वजनिक आणि बँकांच्या ताब्यातली मालमत्ता फक्त अदानीच्या खिशात घातली जात आहे. याला Free Market म्हणजे मुक्त बाजार म्हणता येणार नाही. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सरकारी संपत्तीचे केलेले हस्तांतरण आहे. काही लोकांच्या हाती देशाच्या अर्थव्यवस्थेची मालकी जाणे ही फक्त भांडवलशाही नाही, तर मित्रपुंजीवाद (Crony Capitalism) आहे. अशाने देश आणि लोकशाही कमजोर होते. ‘वेदांत समूह आता या भ्रष्ट व्यवहाराविरुद्ध सुप्रीम कोर्टात गेला; कारण ‘जयपी’ व्यवहारात अदानीला फायदा व्हावा म्हणून सरकारी यंत्रणांचा गैरवापर झाला. त्यात सरकारी तिजोरीला 3,000 कोटींना चुना लावण्यात आला. वेदांत ग्रुपची न्यायालयीन लढाई याच मुद्द्यावर होईल. यात सुखावणारी गोष्ट अशी की, कालपर्यंत अनिल अग्रवाल हे पंतप्रधान मोदी व त्यांच्या धोरणांची ‘भगतगिरी’ करीत होते. मोदींमुळे युरोप, अमेरिकेत भारतीय उद्योगपतींची प्रतिष्ठा कशी वाढली ते सांगत होते, पण प्रत्यक्षात एका अदानीसाठी मोदी सरकारने अनिल अग्रवाल यांचीच फसवणूक केली. आता या प्रकरणाचे न्यायालयात काय होणार? लोक म्हणतात, अदानी समूहाच्याच बाजूने सुप्रीम कोर्टात निकाल लागेल. आम्हाला मुख्य न्यायाधीश सूर्य कांत यांच्यावर पूर्ण भरवसा आहे!
सर्व काही एका माणसासाठी
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात सध्या क्रोनी कॅपिटॅलिझम (Crony Capitalism) चाच जोर वाढला आहे. व्यापार क्षेत्रात भारत अमेरिकेचा गुलाम बनला आहे. आखाती युद्धानंतर अमेरिकेने भारतावर तेल खरेदीचे निर्बंध लादले. अमेरिकेच्या परवानगीशिवाय मोदींच्या नव्या भारताला रशियासारख्या मित्राकडूनही तेल खरेदी करता येत नाही. हे जागतिक बाजारातले क्रोनी कॅपिटॅलिझम आहे. हीसुद्धा मुक्त बाजार अर्थव्यवस्था नाही. सत्ता भोगणारे मुख्य नेते, काही निवडक उद्योगपती, व्यावसायिक, सावकार यांच्यातील घनिष्ठ संबंधांमुळे सर्व सरकारी संपत्ती, करसवलती, कर्जमाफी, कर्जव्यवस्था याबाबत उघड पक्षपात होतो. निकोप स्पर्धा संपवली जाते व फक्त अदानी, इतर दोन – चार उद्योगपतींचाच फायदा केला जातो. देशाच्या तिजोरीचे यात नुकसान होते. ‘जयपी’ व्यवहारातच तीन हजार कोटींचे नुकसान झाले ते स्पष्ट दिसते. गौतम अदानी यांच्या अकृत्रिम उद्योग विस्तारासंबंधात एक जोरदार प्रेझेंटेशन श्री. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत केले. तेव्हा अनेकांची बुबुळे बाहेर आली, पण अदानी यांची घोडदौड थांबली नाही. अदानी समूहाला देशातील बंदरे, विमानतळ, वीज प्रकल्प, एसईझेड प्रकल्प, हजारो कोटींची सरकारी कंत्राटे, स्वस्त जमिनी व ती खरेदी करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मोठी कर्जे दिली. म्हणजे सरकारी पैशानेच श्री. अदानी हे सरकारी संपत्ती विकत घेत आहेत व मालामाल बनत आहेत. मुंबई, अहमदाबाद, जयपूर, लखनौ, गुवाहाटी असे सहा विमानतळ अदानी ग्रुपला एकाच बोलीवर मिळाले. हे सर्व विमानतळ आज आंतरराष्ट्रीय दर्जा न राखता चालवले जात आहेत. ‘धारावी’ पुनर्वसनासारखे प्रकल्प बेकायदेशीरपणे याच समूहाच्या घशात घातले. मुंबईतील 60 टक्के भूखंड हे याच समूहाकडे व उरलेले लोढा समूहाकडे. मुंबईतले सर्वाधिक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हे फडणवीस कृपेने एकाच बिल्डरच्या ताब्यात आहेत. हे सर्व भाजपच्या सहकार्याने चालते. जनतेचे, राज्यांचे, सार्वजनिक क्षेत्राचे नुकसान करून हे करणे म्हणजे राष्ट्रीय अपराध आहे व या व्यवहारातले ‘किकबॅक’ सगळ्यांनाच त्यांच्या लायकीप्रमाणे मिळत असते. सरकार, न्यायालये, सार्वजनिक बँका व राजकारणी, भारतातील क्रोनी कॅपिटॅलिझमच्या कमिशनमध्ये समान भागीदार आहेत.
सत्य, धर्म, साहस
वेदांत समूहाच्या अनिल अग्रवाल यांनी भारतातील क्रोनी कॅपिटॅलिझमविरुद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेतली. अग्रवाल यांना परिणामांची नक्कीच कल्पना असावी. अग्रवाल हे इंग्लंडमधील स्वतःच्या ‘पॅलेस’मध्ये राहतात. तरीही ते स्वतःला प्रथम ‘बिहारी’ व मग भारतीय मानतात. या घडामोडीनंतर अनिल अग्रवाल त्यांच्या ‘एक्स’ माध्यमावर लिहितात, “आज सकाळी भगवद्गीतेतील 16वा अध्याय मी वाचला. एका विचाराने मी स्तब्ध झालो. ‘हिम्मत ठेव, विचलित होऊ नको, नम्र रहा, कोणत्याही स्वार्थाशिवाय तुझे कर्तव्य बजावत रहा.’ जीवनाचे हेच ध्येय असायला हवे. मला आठवते, काही वर्षांपूर्वी जयप्रकाश गौर मला लंडनला भेटायला आले. जयपी ग्रुप ठ्या कष्टाने त्यांनी उभारला होता. एक साम्राज्यच त्यांनी निर्माण केले. ते मला पुढे अनेकदा भेटले. त्यांनी मला अनेकदा हिंदीत पत्रे लिहिली. त्यांची एकच इच्छा अनेकदा दिसली ती म्हणजे, त्यांनी उभे केलेले हे उद्योग अत्यंत सुरक्षित हातात जावेत व त्याचा विनियोग प्रामाणिकपणे व्हावा. या कार्यात मी त्यांना मदत करावी अशी त्यांची इच्छा दिसली, पण आम्ही त्यांच्या संपत्तीत फार रस घेतला नाही. अलीकडेच ही सर्व संपत्ती Public Auction म्हणजे सार्वजनिक लिलाव प्रक्रियेत कायदेशीर मार्गाने आली. अनेक मोठ्या कंपन्या व बिडर्स (Bidders) नी यात बोली लावली. अचानक मला जयप्रकाश गौर यांच्या भावना व इच्छा याबाबत जाणीव झाली. त्या लिलाव प्रक्रियेतून पुढे अनेक कंपन्यांनी माघार घेतली. शेवटी आमची सर्वोच्च बोली ठरली आणि आम्ही त्या लिलावातील बोलीत यशस्वी ठरलो. ही अत्यंत पारदर्शक प्रक्रिया होती. आम्हाला कायदेशीररीत्या लेखी स्वरूपात कळवले की, तुम्ही जिंकलात; पण जीवन इतके साधे सोपे नसते. काही दिवसांनी हा निर्णयच फिरवण्यात आला. हे धक्कादायक होते. आम्हाला या संपत्तीचा अजिबात मोह नाही. जर ती मिळाली तर ती ईश्वराची इच्छा. ती हातून गेली तरीही ईश्वराचीच इच्छा. जर ‘धर्म’ एखादी गोष्ट आम्हाला देत असेल तर ती नाकारू नये. विश्वास, सत्य आणि श्रद्धा या भावनांशी तडजोड होता कामा नये. आता यावर उत्तर काय? गीता त्यावर मार्गदर्शन करते, ‘तुझे कर्तव्य तू हिमतीने पार पाड.’ कोणत्याही रागाशिवाय आणि मोहाशिवाय आम्ही तेच करत आहोत.”
“आम्ही सत्याचा आणि धर्माचा मार्ग स्वीकारू. बाकी सर्व आम्ही ईश्वरावर सोडतो!”
अनिल अग्रवाल यांनी सत्य, धर्म व साहसाचा मार्ग स्वीकारून महाभारताचा शंखनाद फुंकला आहे.
भारतात हे गेल्या 12 वर्षांत प्रथमच घडत आहे.
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]






























































