
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामामुळे बंद आहे. असे असतानाही भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मंदिरात जाऊन व्हीव्हीआयपी दर्शन घेतले. याबाबत आज विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. महाराष्ट्राविषयी द्वेष असणाऱ्या निशिकांत दुबे यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट का दिली? ते सरकारचे जावई आहेत का, असा संतप्त सवाल शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी विचारला.
पुण्यातील भीमाशंकर मंदिर पुरातन विभागाने गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून काम सुरू असल्यामुळे बंद ठेवले आहे. महाशिवरात्रीलादेखील भाविकांना दर्शन करता आले नाही. लोकप्रतिनिधी असूनही तुम्ही आम्ही तिथे जाऊ शकत नाही; पण निशिकांत दुबे असे कोण व्हीव्हीआयपी लागून गेले की, त्यांनी हेलिकॉप्टरने यायचे आणि भीमाशंकरचे दर्शन घ्यायचे? ते काय सरकारचे जावई आहेत का, असा सवाल करत सचिन अहिर यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
हेलिकॉप्टरला लँडिंगसाठी परवानगी कशी दिली?
फॉरेस्टच्या जमिनीवर निशिकांत दुबे यांच्या हेलिकॉप्टरला लँडिंगची परमिशन कशी दिली? हेलिपॅडवर गाड्या कुणाच्या होत्या? त्यामुळे शासनाने या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सचिन अहिर यांनी केली. जिल्हाधिकारी हे झारखंडच्या बॅचचे असल्याकडे अहिर यांनी लक्ष वेधले. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी याबाबत चौकशी केली जाईल असे सांगितले.






























































