
निसर्गरम्य सौंदर्य व अभियांत्रिकी चमत्कारामुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करणाऱ्या कोकण रेल्वेचा प्रवास पुस्तक रूपात प्रवाशांच्या भेटीला आला आहे. ‘कोकण रेल्वे कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन शुक्रवारी चित्रपट अभिनेते-निर्माता सचिन पिळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात आश्चर्यकारक छायाचित्रे आणि आकर्षक कथांद्वारे कोकण रेल्वेच्या आतापर्यंतच्या प्रवासावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात ‘कोकण रेल्वे कॉफी टेबल बुक’चा प्रकाशन सोहळा पार पडला. याप्रसंगी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, ऑपरेशन्स आणि कमर्शियल विभागाचे संचालक सुनील गुप्ता, मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांच्यासह कॉर्पोरेट कार्यालयातील इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ‘कोकण कॉफी टेबल बुक’मध्ये कोकण रेल्वे मार्गावरील अभियांत्रिकी चमत्कार, निसर्गरम्य सौंदर्य तसेच या भागातील विकासावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.