सचिन-लारा पुन्हा मैदानात उतरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 क्रिकेटचा इतिहास पुन्हा धगधगणार आहे. इंटरनॅशनल मास्टर्स लीगचा (आयएमएल) दुसरा हंगाम जाहीर होताच, चाहत्यांमध्ये उत्साहाला अक्षरशः उधाण आले आहे. 24 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान मुंबई, वडोदरा आणि विझागच्या मैदानांवर दिग्गजांच्या होणाऱ्या या महायुद्धात सचिन तेंडुलकर, ब्रायन लारासह अनेक खेळाडू फटकेबाजी आणि त्रिफळे उडवताना दिसतील.

पहिल्या हंगामात ‘हिंदुस्थान मास्टर्स’ने विजेतेपद पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले होते. आता या यशाची ज्वाला आणखी भडकणार आहे. सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, युवराज सिंग, ख्रिस गेल आणि कुमार संगक्कारासारखे क्रिकेटचे महायोद्धे पुन्हा एकदा मैदान दणाणून सोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या प्रत्येक फटक्यावर स्टेडियम हादरेल, तर प्रत्येक चेंडूवर थरार उसळलेला पाहायला मिळेल. आयएमएलने पहिल्याच हंगामात 246 दशलक्ष प्रेक्षकांपर्यंत पोहोचत विक्रमी यश मिळवले. आता दुसऱया पर्वात वेग, आक्रमकता आणि रोमांच यांचा तिहेरी थरार पाहायला मिळणार आहे. यंदा ही स्पर्धा अधिक जोरदार, अधिक वेगवान आणि अधिक चुरशीची होईल, असे भाकीत लीगचे आयुक्त सुनील गावसकर यांनी वर्तवले आहे.