जाऊ  शब्दांच्या गावा – सोयऱ्यात साडू अन् भोजनात लाडू

>> साधना गोरे

मागे कधीतरी समाज माध्यमांवर एक गमतीशीर पोस्ट वाचली. साडू साडू म्हणजे काय, तर एकाच पंपनीने फसवलेले दोन गिऱहाईक. खरं तर अशीच कोटी ‘जावा जावा’ यांच्यावरही करता येईल, पण यातला गमतीचा किंवा चढाओढीचा भाग थोडा बाजूला ठेवू आणि ‘साडू’ या शब्दाकडे लक्ष देऊ.

साडू म्हणजे बायकोच्या बहिणीचा नवरा. मराठीतल्या या शब्दाशी मिळतीजुळती रूपं इतर भाषांतही आहेत. हिंदी आणि पंजाबीमध्ये ‘साढू’, गुजरातीत ‘साडू’, सिंधीत ‘संढू’, तेलुगूमध्ये ‘सड्डाकुरू’ किंवा ‘शढ्ढ्ाकुरू’ असे शब्द आहेत. एवढ्या भाषांत आढळणारा हा शब्द कुठून आला, तर संस्कृतमधील ‘श्यालीवोढृ’ या शब्दात त्याचं मूळ सापडतं. ‘श्याली’ म्हणजे मेहुणी (बायकोची बहीण) आणि ‘वोढृ’ म्हणजे नवरा. कालांतराने ‘श्याली’चं झालं ‘सा’ आणि ‘वोढृ’चं झालं ‘डू’ किंवा ‘ढू’. तेलुगूने तर त्याच्या पुढे ‘कुरू’ हा संबोधनवाचक शब्दही जोडला.

साडूची बायको म्हणजे संस्कृतमध्ये ‘श्याली’. त्याचं हिंदीसह अनेक भाषांमध्ये ‘साली’ झालं. महाराष्ट्रातही काही भागांमध्ये, विशेषतः विदर्भ आणि खान्देशात मेहुणीला ‘साली’ म्हटलं जातं, पण मराठीत त्यासाठी ‘मेहुणी’ असा खास वेगळा शब्द आहे, पण महाराष्ट्राच्या काही भागांत आतेबहिणीला, मामेबहिणीलासुद्धा मेहुणी म्हटलं जातं, तर आतेभाऊ, मामेभाऊ, बायकोचा भाऊ, बहिणीचा नवरा यांना मेहुणा म्हटलं जातं. तर या मेहुणा – मेहुणीचं मूळ काय? हा शब्द संस्कृतमधील ‘मैथुनिक’ किंवा ‘मिथुन’ शब्दापासून आल्याचं ‘व्युत्पत्तिकोशा’त म्हटलं आहे, पण हा शब्द प्रामुख्याने जोडप्यासाठी म्हणजे दांपत्यासाठी वापरला जातो. ‘गीर्वाणलघुकोशा’तही तो याच अर्थाने दिलेला आहे. ‘मेहुणा-मेहुणी’ आणि ‘मैथुनिक’ यांच्या संबंधाचं कोडं उलगडण्यासाठी द्राविडी संस्कृतीमधील विवाह परंपरा समजून घ्यावी लागेल.

मराठीतल्या बहुनातेवाचक या शब्दांचं मूळ तामीळ भाषेत सापडतं. तामीळमध्ये ‘मैत्तुनन्’ म्हणजे पत्नीचा भाऊ, आतेभाऊ, मामेभाऊ. शिवाय दिराला म्हणजे नवऱ्याच्या भावाला उद्देशूनही हाच शब्द वापरला जातो, तर ‘मैत्तुनी’ म्हणजे बायकोची बहीण, मामेबहीण, आतेबहीण तसंच भावाच्या बायकोला म्हणजे भावजयीलाही हाच शब्द वापरला जातो. मराठीत मात्र दीर आणि भावजय ही दोन नाती वगळून ‘मेहुणा – मेहुणी’ शब्द वापरले जातात. द्राविडी संस्कृतीत आतेभाऊ – मामेबहीण यांचे किंवा उलटही विवाहसंबंध केले जातात. त्यामुळे त्यांना जोडपं या अर्थाने ‘मेहुणा-मेहुणी’ म्हटलं गेलं असावं.

साडू आणि मेहुणी या नात्यांचं आपल्या संस्कृतीत काय स्थान आहे हे दर्शविणाऱ्या काही मोजक्या म्हणी आहेत. मेहुणी, त्यातही ती बायकोपेक्षा लहान असेल तर तिच्याकडे जवळकीच्या नात्याने पाहिलं जातं. एखाद्याशी अति थट्टा-मस्करी करताना कुणी दिसलं तर घरातली वडीलधारी मंडळी म्हणतात, ‘‘एवढं खिदळायला ती काय तुझी मेहुणी (किंवा मेहुणा) हाय?’’ अशा शब्दप्रयोगातून आपल्या समाजाने जणू मोकळंढाकळं बोलण्याची मुभा फक्त याच नात्यात आहे हे मान्य केलं आहे.  आपल्या पुरुषप्रधान मराठी आणि एकूणच भारतीय संस्कृतीत मेहुणीवर एवढा हक्क सांगितला जातो की, ‘मेहुणी म्हणजे अर्धी बायको’ यासारखी म्हण रूढ झाली आहे. हिंदीतही ‘साली आधी घरवाली’ असते. एखाद्याची बायको तारुण्यातच वारली, तर धाकट्या मेहुणीशीच लग्न लावून देण्याची पद्धत आजही अनेक समाजामध्ये आहे.

एका स्त्री गीतात मेहुणी आपल्या भावोजींना म्हणजे बहिणीच्या नवऱ्याला कसा आग्रह करते पहा – ‘बंधू सासऱ्याला गेलं, मेहुणी म्हणती ऱहावा ऱहावा’. तर संत तुकारामांच्या एका अभंगात पुढील ओळी आहेत – ‘सखी ते मेहुणी टांचेंचे काळीज। सांगतसे गुज एकांताचें। बायलेचा भाऊ सखा तो मेहुणा। नेतसे भोजना आदरेसां।’

पुरुष आणि स्त्राr या दोघांनाही नातेवाईक असतात, पण बाई अनेक नात्यांमध्ये ज्या तऱहेने वेढलेली असते, तसं पुरुषाचं असत नाही. यावरून ‘राजाची राणी ती पाटलाची मेहुणी’ अशी म्हण आहे. म्हणजे ‘राजघराण्यातली स्त्राr असली तरी ती कुणाची तरी मेहुणी असेलच ना, तिचे कुणी नातलग असतीलच की!’ या अर्थाने ही म्हण वापरली जाते.

बहिणी-बहिणींमध्ये वयाचं फार अंतर नसेल तर त्यांचे नवरेही शक्यतो सारख्याच वयाचे असतात. त्यामुळे साडू – साडूमध्येही अधिक जवळीक निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे नातं इतर नात्यांपेक्षा कसं उजवं आहे हे सांगताना ‘सोयऱ्यात साडू अन् भोजनात लाडू’ असं म्हटलं जातं.

[email protected]