
दिल्लीतील श्रीमद्भागवत कथेदरम्यान घडलेल्या एका प्रसंगामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे. ईशान्य दिल्लीतील घोंडा विधानसभा क्षेत्रातील करतार नगर येथे श्रीमद्भागवत कथा आयोजित करण्यात आली होती आणि मंचावर संत लोकेशनंद महाराज (गुफाधाम सरकार) प्रवचन करत होते. भक्तिमय वातावरण, सुरू असलेले थेट प्रक्षेपण आणि प्रवचनाच्या दरम्यानच त्यांनी स्थानिक आमदारांना उद्देशून “आमदारांनी रस्ता करून द्यावा” अशी थेट मागणी केली. अचानक आलेल्या या विधानावर प्रेक्षकांमध्ये हास्यकल्लोळ उडाला, तर समोर बसलेले आमदार अजय महावर काहीसे अस्वस्थ झाले.
बुधवारी झालेल्या प्रवचनादरम्यान संत म्हणाले की, “एक गोष्ट मात्र जरूर सांगतो. मला पुढे बोलवले किंवा नाही बोलवले तरी मला फरक पडत नाही. साधूला जे दिसते तेच तो बोलतो.” एवढे म्हणत त्यांनी करतार नगरमधील रस्त्यांच्या स्थितीवर भाष्य करत सांगितले की, “आम्ही इंग्लंडपर्यंत कथा केली आहे; पण करतार नगरच्या गल्लींमध्ये आलो तेव्हा वाटले की आपलं गावच बरं. लगेच त्यांनी स्पष्ट केले की, “माझे बोलणे मनावर नको घेऊ. हा भाग सुंदर झाल्या तर सगळे तुमचेच कौतुक करतील.”
हा संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून त्यावरून आम आदमी पार्टीने घोंडा मतदारसंघातील भाजप आमदार अजय महावर यांच्यावर निशाणा साधला आहे. 2025 च्या विधानसभा निवडणुकीत आपचे उमेदवार राहिलेले गौरव शर्मा यांनी संतांनी व्यक्त केलेले शब्द हे या भागासाठी दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागल्यानंतर आमदार अजय महावर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.
महावर यांनी सांगितले की, संतांची कलशयात्रा फतेहसिंग मार्गावरून काढण्यात आली होती आणि त्या मार्गावर पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता सध्या खोदलेला आहे. आमदार निधीतून जवळपास तीन कोटी रुपये खर्च करून त्या रस्त्याचे काम सुरू असून लवकरच पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, कथाचे आयोजक संतांना त्याच मार्गाने घेऊन गेले ही त्यांची चूक होती आणि नंतर त्यांनी स्वतः संतांना संपूर्ण माहिती दिली असून आयोजकांनीही आपली चूक मान्य केल्याचे स्पष्ट केले.


























































