संत तुकोबांचे पुण्यस्मरण

486

<< प्रासंगिक >>  नामदेव सदावर्ते

समर्थ रामदास स्वामींना सामर्थ्य-मूर्ती, संत ज्ञानदेवांना ज्ञान-मूर्ती, संत एकनाथांना शांती-मूर्ती, संत नामदेवांना प्रेम-मूर्ती आणि संत तुकारामांना वैराग्य-मूर्ती म्हणून महाराष्ट्र मानतो. वारकरी संप्रदायात संतांच्या देहत्यागदिनालाही अलौकिक महत्त्व आहे. संत ज्ञानराजांच्या पुण्यतिथीस संजीवन समाधी सोहळा मानतात. समर्थ रामदास स्वामींच्या पुण्यतिथीस दास-नवमी या नावाने संबोधतात. संत तुकारामांच्या देहत्यागदिनाला वैकुंठगमनदिन व तुकाराम बीज या नावाने ओळखतात. संतांचे जीवन अलौकिक तसेच त्यांच्या जीवनाचा शेवटही अद्वितीय. संत नामदेवांनी तर पंढरपूरच्या श्रीविठ्ठल मंदिराच्या प्रथम पायरीवरच देहत्याग केला. ते म्हणतात-

नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे।

संत पाय हिरे देती वर।।

सर्व संतांत अलौकिक असलेला तुकोबांचा वैकुंठगमन दिन अर्थात तुकाराम बीज! संत तुकारामांचे सारे जीवन भगवंतांच्या नामनिष्ठेवर अधिष्ठत होते. त्यांना सृष्टीतील सर्व सजीव-निर्जीवात भगवंतरूप दिसत होते. सर्व मानवात ईश्वररूप पाहत ते जीवन जगत होते. संसारातील दुःखाकडे ईश्वरीय योजना मानून ते कर्तव्यकर्म करीत होते. कोरडा भीषण दुष्काळ, अन्नपाण्यावाचून गुरेढोरे माणसे तडफडून मरत होती. अशा काळात स्वतःचे सावकारी पाश बाजूला ठेवून केवळ मानवतेसाठी सर्वांना कर्जमाफी देऊन सावकारी बंद करणारे तुकोबा हे संवेदनशील वृत्तीचे संतपुरुष होते.

तुकोबांच्या आईवडिलांच्या निधनानंतर वयाच्या २१ व्या वर्षी शके १५५१-५२ या वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. त्यांची प्रथम पत्नी व मुलगा याच दुष्काळात मृत्यू पावले. अशा दुःखव्याप्त मनःस्थितीत तुकोबा भंडारा डोंगरावर जाऊन विठ्ठलभक्तीत रमले. वृक्षवल्ली, पशुपक्षी यांना आपले सखेसोयरे मानीत त्या डोंगरावरील एकांतात ते ईश्वराची उपासना करीत होते. या काळात त्यांना झालेला आत्मानुभव, स्वप्नात झालेल्या बाबाजी चैतन्यांच्या गुरुपदेशामुळे तुकोबांचे जीवन बदलले.

वयाच्या २७व्या वर्षी शके १५५७ साली तुकोबांना आणखी एक स्वप्नदृष्टांत झाला. संत नामदेव श्रीविठ्ठलासह आले आणि तुकोबांना त्यांनी अभंगरचना व कीर्तन करण्याचे सांगितले. तुकोबांच्या घराण्यात असलेली विठ्ठलभक्ती, आळंदीच्या ज्ञानराजांचे अभंग, भावार्थ दीपिका, हरिपाठातून मिळालेले अध्यात्म संस्कार, गुरूकृपेमुळे झालेला आत्मानुभव यातून तुकोबांचे जीवन आध्यात्मिक दृष्टीने समृद्ध होत होते. एका बाजूने यवनांकडून होणारे अत्याचार, लुटमार, दहशत, दुष्काळामुळे येणारे नैराश्य, अंधश्रद्धा, वर्णव्यवस्थेतून आलेले धार्मिक कर्मकांडांचे मानसिक दडपण यामुळे बहुजन समाजातील लोक दुबळे झाले होते. अशा काळात तुकोबांचे अभंग जनसामान्यांना धीर देत होते. जगण्याचे बळ देत होते. नवचैतन्य देत होते. ईश्वरनिष्ठा व हरिनामस्मरणाची सोपी उपासना यातून बहुजनांचे जीवन सुखावत होते.

तुकोबांच्या मुखातून प्रकट होणाऱ्या अनुभवजन्य अभंगांमुळे सामान्य संसारी जनलोकांना आनंद, धीर मिळत होता. संसारतापाने तापलेल्या जीवांना विश्रांती, शांतता मिळत होती.

अनगडशा फकीर या मुस्लिम साधूने तुकोबांचे मोठेपण जाणून म्हटले आहे –

तुका तुला रामसे, एक नाम दो अंग।

उनका सेतू हुआ दुभंग, इनका सेतू अभंग।।

सामान्य जनतेचे जीवन समृद्ध करणारे तुकोबांचे अभंग आजही जनमनात स्थिर असून संकटावर मात करण्याचे सामर्थ्य देत आहेत. संत नामदेव व श्रीविठ्ठलाच्या प्रेरणेने तुकोबांनी कवित्व स्फूर्ती घेऊन अभंगरचना केली. ज्ञानाच्या बळावर कवित्व करणारे पुष्कळ कवी आहेत. पण भगवंतांच्या व गुरुदेवांच्या प्रेरणेने अनुभवजन्य असे जे काव्य असते ते अक्षरसाहित्य ठरते. तुकोबांचे अभंग हे महाराष्ट्र साहित्यशारदेचे अनमोल लेणे आहे.

आयुष्यभर हरिनाम स्मरणावर अविचल श्रद्धा ठेवून जनहितार्थ जीवन जगलेले तुकोबा सदेह वैकुंठास गेले. त्यापूर्वी त्यांनी भाविकांना शेवटचे मार्गदर्शन केले. ते अभंग अत्यंत मननीय आहेत.  महाराष्ट्रातील भाविक जनतेची या अलौकिक घटनेवर श्रद्धा आहे. तुकोबांचे अभंग भोळ्या भाविकांसाठी अमृताहुनी गोड आहेत. तुकोबांनी केलेली अभंगरचना हासुद्धा एक चमत्कारच आहे. त्यातील शब्दरचना रसाळ, अर्थपूर्ण असल्याने ते अभंग आजही लोकप्रिय आहेत.

वैकुंठगमनाच्या दिवशी तुकोबा देहूतील इंद्रायणी नदीकाठी असलेल्या नांदुरकीच्या झाडाखाली कीर्तनासाठी उभे राहिले. एरव्ही स्वतःला अणूरेणूसारखे लहान समजणारे तुकोबा आकाशाएवढे मोठे दिसू लागले. देहू परिसरातील शेकडो भाविकभक्त देहूच्या इंद्रायणीतिरी जमले. तुकोबा तल्लीनतेने अभंगातून वैकुंठनाथांना साद घालीत होते. जमलेल्या भाविकांना मार्गदर्शनही करीत होते. ते म्हणाले-

आपुल्या माहेरा जाईन मी आता।

निरोप या संताहाती आला।।

त्याचि पंथे माझे लागलेसे चित्त।

वाट पाहे नित्य माहेराची।।

उपस्थित जनसमुदायाला उद्देशून तुकोबा म्हणाले, तुम्ही सारे मला निरोप द्या आणि सर्वांनी घरी जा. धर्मनिष्ठsने कर्म कराल तर तुमचे कल्याण होईल असा माझा आशीर्वाद आहे. ते म्हणाले-

आम्ही जातो आता कृपा असो द्यावी।

सकळा सांगावी विनंती माझी।।

 

आपली प्रतिक्रिया द्या