
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे सिक्वेल वन सोल्युशन प्रा. लि. च्या कर्मचाऱ्यांना 2025 ते 2028 या तीन वर्षांसाठी नऊ हजार रुपये पगारवाढ मिळाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना नेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांनी यासाठी पाठपुरावा केला.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय सहार कार्गो येथील महत्त्वाचे डेटा इन्ट्री काम करणाऱ्या ‘सिक्वेल वन’च्या कर्मचाऱ्यांना या पगारवाढीमुळे दिलासा मिळाला आहे. याशिवाय प्रत्येक कामगारांना तीन लाखांचा मेडिकल इन्शुरन्स व पाच लाखांचा टर्म इन्शुरन्सदेखील कंपनीकडून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुट्ट्या व इतर सुविधाही देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत विमानतळावर काम करणाऱ्या बहुतांश कंपन्या बंद पडत असताना कमी कामगारांमध्ये काम करून घेणे, सध्या असलेला पगार कमी करण्याचा ट्रेंडच सुरू आहे. असे असताना सध्याच्या वाढत्या महागाईत पगारवाढ मिळाल्याने कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पगारवाढीच्या निर्णयाप्रसंगी संयुक्त सरचिटणीस संजय कदम आणि सहचिटणीस संजीव राऊत टीमचे आभार मानले. यावेळी कंपनीचे संचालक श्रीकृष्णा जोशी, भा.का.से. युनिट कमिटी अपूर्वा जुईकर, विमल सिंग, शिवाजी राऊळ, मंगेश पाटील, मुकेश पनाळकर, नंदकिशोर यादव व कामगार उपस्थित होते.