
बॉलिवूडचा ‘दबंग’ स्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत असून, आज या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे पहिले अधिकृत पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमधील सलमानच्या नव्या आणि करारी लूकने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
आज समोर आलेल्या या पोस्टरमध्ये सलमान खान अतिशय गंभीर आणि प्रभावी भूमिकेत दिसत आहे. विशेष म्हणजे पोस्टरची पार्श्वभूमी ही देशभक्तीचा संदेश देणारी असून, त्यात तिरंग्याची छटा आणि युद्धाची काही दृश्ये पाहायला मिळत आहेत. सलमानचा हा नवा लूक त्याच्या आजवरच्या ‘टायगर’ सिनेमापेक्षा वेगळा आणि अधिक शक्तिशाली असल्याचे बोलले जात आहे. करण शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली साकार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांच्या ‘नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट’ बॅनरखाली केली जात आहे.
View this post on Instagram
‘मातृभूमी’ हा चित्रपट एक हाय-ऑक्टेन ॲक्शन ड्रामा असून त्याचे कथानक प्रखर देशभक्तीवर आधारित असल्याची माहिती समोर येत आहे. पोस्टर रिलीज होताच काही वेळातच ‘Matrubhoomi’ हा हॅशटॅग सोशल मीडियावर टॉप ट्रेंडमध्ये आला आहे. सलमानचे चाहते या पोस्टरला उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून “ब्लॉकबस्टर चित्रपट येणार” अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. बराच काळानंतर सलमान खान एका सशक्त कथानकासह आणि नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत असल्याने चित्रपट व्यापार विश्लेषकांकडूनही या चित्रपटाबाबत मोठ्या सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.






























































