आयपीएलला धक्क्यांवर धक्के, नवा हंगाम सुरू होण्याआधीच अष्टपैलू सॅम करनचीही माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल सुरू होण्याआधीच आयपीएलला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. गुरुवारीच पॅट कमिन्स, नॅथन एलिस हे स्पर्धेतून आऊट झाल्यामुळे आयपीएलच्या संघांना मोठा धक्का बसला होता. आता त्यात इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनचेही नाव जोडले गेले आहे. जांघेतील स्नायूंच्या दुखापतीमुळे तो आता राजस्थान रॉयल्सकडून संपूर्ण हंगामातून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच काही स्टार खेळाडूंनी दुखापतींमुळे माघार घेतल्याने स्पर्धेची रंगत धोक्यात आली असताना, करनच्या संभाव्य अनुपस्थितीने फ्रेंचायझींची चिंता आणखी वाढवलीय.

आयपीएल आठवडय़ावर आली असताना केवळ अनेक संघांना मोठे फटके बसले आहेत. काही खेळाडूंना दुखापतींमुळे माघार घ्यावी लागली, तर काही जण फिटनेसच्या समस्यांमुळे अजूनही साशंक आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या आधीच संघांचे संतुलन ढासळताना दिसतेय.

राजस्थान रॉयल्ससाठी हा धक्का अधिक मोठा मानला जातोय. कारण करन हा संघाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्याच्या अनुपस्थितीत रवींद्र जाडेजा आणि डोनोव्हन फरेरा यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी येणार आहे. विशेष म्हणजे कर्णधारपदासाठी अनुभवी खेळाडूंना डावलून रियान परागवर विश्वास दाखवल्याने आधीच चर्चेत असलेल्या संघाला आता दुहेरी आव्हान झेलावे लागणार आहे.

आयपीएलच्या रणधुमाळीला अजून सुरुवातही झालेली नाही, पण दुखापतींच्या मालिकेमुळे स्पर्धेवर अनिश्चिततेचं सावट पसरलेय. पुढे अजून किती धक्के बसणार, याकडेच आता सर्वांचं लक्ष वेधलं गेलेय. तसेच आयपीएलचा दोन महिन्यांचा काळ खेळाडूंचा चांगलाच दम काढतो. त्यामुळे यंदाची इंडियन प्रीमियर लीग इंजर्ड प्लेअर लीग होणार नाही ना, अशी भीतीचे वातावरण आयपीएल संघमालकांच्या चेहऱयावर दिसू लागले आहे.