
अंधेरीच्या जे. बी. नगरात जय जय रघुवीर समर्थ चा घोष घुमू लागला आहे. समर्थ रामदास स्वामींचे विचार तसेच त्यांच्या पादुकांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी समर्थ भक्त पू. मोहनबुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ रामदास स्वामींच्या पादुका अंधेरीवासीयांच्या दर्शनासाठी कांती नगरातील उद्यान गणेश मंदिरात विराजमान झाल्या आहेत. अध्यात्म, राष्ट्रभक्ती आणि बलोपासना याचा मंत्र समर्थ रामदास स्वामींनी अवघ्या जगताला दिला तर त्यांच्या श्लोक आणि सवायांमधून आधुनिक जगतात वापरण्यात येणाऱया मॅनेजमेंटचे धडे दिले.
समर्थ रामदास स्वामींचे विचार जनमानसात पोहोचावेत यासाठी वर्षातून एकदा समर्थ रामदास स्वामींच्या आणि त्यांचे शिष्य श्रीधर स्वामी महाराज यांच्या दुर्मिळ पादुकांचा दर्शन सोहळा मुंबई आणि पालघर जिह्यात आयोजित केला जातो. या पादुकांचे आगमन अंधेरी पूर्वेतील जे. बी. नगर कांती नगर येथील उद्यान गणेश मंदिरात झाले आहे. 23 जानेवारीपर्यंत भक्तांना या पादुकांचा लाभ घेता येणार आहे.
रामदासी सांप्रदायिक उपासना
दररोज सकाळी सहा वाजता काकड आरती आणि अभिषेक झाल्यानंतर समर्थ रामदास स्वामींच्या पादुका घरोघरी दर्शनासाठी नेल्या जातात. सायंकाळी नर्मदा महात्म्य यावर उदयनजी आचार्यांचे प्रवचन होते. श्री गणेश मंदिरातील नित्य आरतीनंतर रामदासी सांप्रदायिक उपासना, आरती आणि शेजारती केली जाते. घरोघरी या पादुकांचे पूजन व्हावे असे आवाहन उद्यान गणेश मंदिराचे अध्यक्ष शेखर पारखी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: स्वाती भार्गव 8355812868.
राष्ट्रभक्ती आणि शक्तीचा प्रेरक मंत्र
साडेतीनशे वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी राष्ट्रभक्ती आणि शक्तीचा प्रेरक मंत्र अवघ्या जगताला दिला. त्यांच्या पादुकांच्या रूपाने त्यांचे विचार घराघरात पोहोचावेत आणि पुढच्या पिढीला समर्थांच्या विचारातून प्रेरणा मिळावी यासाठी वर्षातून एकदा त्यांच्या पादुका मुंबई नगरीत आणल्या जातात.. नगर जिह्यातील खातगाव येथे श्री समर्थांचा भव्य मठ उभारण्यात आला असून भक्त निवासासह मोठी गोशाळाही उभारण्यात आली आहे. या दर्शनाचा लाभ मुंबईकरांनी अवश्य घ्यावा असे आवाहन समर्थ भक्त पू. मोहनबुवा रामदास यांनी केले आहे.
























































