नवाब मलिक यांच्या क्लीन चिटला आव्हान, समीर वानखेडेंच्या बहिणीची न्यायालयात याचिका

अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या तक्रारी प्रकरणी पोलिसांनी त्यांना क्लीन चिट दिल्याने याप्रकरणी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन यांनी न्यायालयात निषेध याचिका दाखल केली आहे. पोलिसांनी पक्षपातीपणा केला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात ते अपयशी ठरले आहेत असा दावा याचिकेत करण्यात आला असून या याचिकेमुळे मलिक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

मलिक यांनी ट्विट आणि मुलाखतींमध्ये यास्मिन यांच्या विरुद्ध खोटे, बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप केला त्यानंतर वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने याप्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 202 अंतर्गत चौकशीचे आदेश दिले व पोलिसांना अहवाल दाखल करण्यास सांगितले. पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात मलिक यांना क्लीन चिट दिली, प्रथमदर्शनी, त्यांच्याविरुद्ध दखलपात्र किंवा अदखलपात्र गुह्याचा कोणताही पुरावा नाही असे त्यात नमूद केले. याविरोधात यास्मिन यांनी अॅड अली काशिफ खान यांच्या मार्फत याचिका दाखल केली असून पोलीस मलिक यांच्या वर्तनाचे समर्थन करत असल्याचे म्हटले आहे याशिवाय चौकशीत पोलिसांनी पक्षपातीपणा केल्याचा दावा याचिकेत केला आहे. या याचिकेवर 22 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.